
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी या वेळी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करतानाच राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी या वेळी दिला. तोपर्यंत ही लढाई सुरू ठेवण्याचे आवाहन करत त्यांनी तरुणांना एकजुटीचा संदेशही दिला.
भारतमाता की जय… वंदे मातरम्… अशा घोषणा देत आदित्य ठाकरे यांनी या आंदोलनाला संबोधित केले. हे कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही तर विद्यार्थ्यांचे आणि देशाचे आंदोलन आहे, असे ते म्हणाले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुणी हात लावू नये म्हणून आम्ही इथे आलो आहोत. कदाचित तुम्ही आम्हाला मतदानही करत नसाल, पण तो तुमचा लोकशाही अधिकार आहे. मतभेद असू शकतात, मात्र विरोध करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आम्ही नेहमीच मान्य करू, असे ते म्हणाले.
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 25 दिवसांनंतर आज आपले आमरण उपोषण मागे घेतल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले. वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले असले तरी आंदोलन सुरूच आहे आणि दिल्लीत अभिजित दिपके व अन्य तरुण मंडळी आंदोलन करत आहेत, आपला आवाजही दिल्लीत पोहोचला पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
प्रेमाने याल तर प्रेम, घाबरवायला याल तर वेदना मिळतील
महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमी आहे. ही भूमी कोणाच्याही भीतीपुढे झुकणार नाही. प्रेमाने चर्चेला याल तर प्रेम मिळेल, पण घाबरवायला याल तर वेदना मिळतील, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिला.
अभिजित दीपकेंना फोन लावला…राजीनामा घेऊनच या
आदित्य ठाकरे यांनी दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या अभिजित दीपके यांना यावेळी सर्व आंदोलकांसमोर फोन लावला. इथे मुंबईत दिल्लीइतकीच तरुणांची गर्दी झाली आहे असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. त्यावर दीपके यांनी आभार मानले. उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासूनच सोनम वांगचुक आणि आपल्या आंदोलनाच्या मागे उभे राहिले आहेत. हा देशाचा, तरुणांचा मुद्दा आहे असे ते सतत बोलतात, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. देशभरातील केसेस मागे घेतल्या जातील असे सरकारने सांगितले आहे आणि उद्या पुन्हा चर्चेसाठी बोलवले आहे, अशी माहिती त्यांनी देताच आदित्य ठाकरे म्हणाले की, आता राजीनामा घेऊनच या, आता सिस्टम बदलायची आहे. ये युवा भारत है… झुकेगा नही. ही तरुण मुले आहेत. दहशतवादी नाहीत.
नवतरुणांनी सरकारला बॅकफूटवर टाकले – अमित ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी या वेळी नवतरुणांनी सरकारला बॅकफूटवर टाकले, अशा शब्दांत आंदोलनाचे कौतुक केले. तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचतोय, तुमची ताकद दिल्लीपर्यंत दिसतेय आणि आम्ही सगळे तुमचे फॉलोअर्स झालो आहोत, असे अमित ठाकरे उपस्थित विद्यार्थी व तरुणांना म्हणाले.
तुम्हाला कुणी हात लावू नये, तुमच्यावर केसेस होऊ नयेत म्हणून आम्ही इथे आलोय. तुमच्यामुळे आज देश पेटून उठला आहे. सरकार बॅकफूटवर गेले आहे आणि अशा दहशतवादी सरकारला बॅकफूटवर टाकणारे आपले तरुण-तरुणी आहेत, असा अभिमान अमित ठाकरे यांनी व्यक्त केला.
सरकारला आता राज्य करणे कठीण जाईल – संजय राऊत
तरुणाईचे तुफान देशभरात रस्त्यावर उतरले आहे. आता भाजप सरकारला राज्य करणे कठीण जाईल. सोपे नाही, अशी प्रतिक्रिया या आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी दिली. सरकार शांत आहे, पण आम्ही अशांत आहोत आणि राहू, असा इशाराही त्यांनी दिला.



























































