
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे एक गुन्हेगार असलेले शिक्षण मंत्री आहेत. आपल्या देशातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होण्याचे ते प्रतीक आहेत. त्यांच्यामुळेच हजारो लोक रस्त्यावर आहेत. प्रधान यांना जावेच लागेल, अशी घणाघाती टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.
20 जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या साहिल नावाच्या विद्यार्थ्यासोबत राहुल गांधी यांनी 10 जनपथ येथे पत्रकार परिषद घेतली. दिल्ली पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केला नसल्याचा दावा केला होता. मात्र, राहुल गांधी यांनी या विद्यार्थ्याला पत्रकारांसमोर आणले. त्याचा हात, पाठ आणि छातीवरील जखमा दाखवल्या. हातात तिरंगा घेऊन शांततेने विरोध प्रदर्शन करत असताना तो पॅलेट गनमुळे जखमी झाला. सरकार म्हणते पॅलेट गन वापरली नाही. पण, साहिलच्या डोळ्यांनाही दुखापत झाली असून तो एका डोळ्याने कदाचित कधीच बघू शकणार नाही. जोपर्यंत प्रधान यांना हटविण्यात येत नाही, तोपर्यंत आम्ही कोणतीही चर्चा करणार नाही, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.




























































