तुमच्यामुळे देशाची बदनामी झाली, पेपरफुटीतील आरोपीला जामीन नाकारताना न्यायालयाने फटकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्ही तुमच्या लोभासाठी आणि अवैध संपत्ती गोळा करण्यासाठी संपूर्ण परीक्षा प्रक्रियाच उधळून लावली. दिवसरात्र मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विश्वासघात केला. एवढेच नाही, तर तुमच्या कृत्यांमुळे देशाची बदनामी झाली, अशी संतप्त टिप्पणी करत दिल्लीतील विशेष न्यायालयाने नीट पेपरफुटीतील प्रमुख आरोपी डॉ. मनोज शिरुरे याचा जामीन अर्ज फेटाळला. तसेच याप्रकरणी अटकेतील सर्व 13 आरोपींची न्यायालयीन कोठडी 6 ऑगस्टपर्यंत वाढवली.

विशेष न्या. अजय गुप्ता यांच्यासमोर डॉ. मनोज शिरुरे याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यावेळी न्या. गुप्ता पेपरफुटीच्या आरोपींवर चांगलेच भडकले. आरोपींना झापताना ते म्हणाले, की तुमच्या निंदनीय आणि बेकायदा कृत्यांमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचा विश्वासघात झाला आहे. दिवसरात्र मेहनत करून, प्रामाणिकपणे अभ्यास करून या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी तयारी केली होती. पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांवर परिणाम झाला. त्यांनी लोभ आणि अवैध संपत्तीसाठी संपूर्ण परीक्षाच उधळून लावली. तुमच्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेच, मात्र, देशाची बदनामी झाली. पेपर लीक गँगचे हे सर्व सक्रिय सदस्य होते, असे म्हणत न्या. गुप्ता यांनी डॉ. शिरुरे याचा जामीन अर्ज फेटाळला.

डॉ. शिरुरेकडून पेपरफुटीसाठी स्वतःच्या रुग्णालयाचा वापर

सीबीआयने सुनावणीदरम्यान जामिनाला विरोध करताना सांगितले की, डॉ. शिरुरे याने एका विद्यार्थ्याकडून पाच लाख रुपये घेऊन एप्रिल महिन्यातच फुटलेला रसायनशास्त्राचा पेपर त्याच्या रुग्णालयातच उपलब्ध करुन दिला. याशिवाय शिरुरे याने आणखी दोन डॉक्टरांची नावे या गँगमधील डॉ. पी. व्ही. कुलकर्णी याला सुचविली होती. या डॉक्टरांनीही पेपरफुटीतून लाभ घेतला.