
एसआरए प्रकल्पात जोगेश्वरी येथील पालिकेच्या मालकीची शाळेची जागा हडपण्याचा डाव उघडकीस आला आहे. याबाबत हरकतीचा मुद्दा शिक्षण समितीच्या सभेत शिवसेनेने उपस्थित करून आवाज उठवला. याप्रकरणी तत्काळ कार्यवाही करून पुनर्विकासात विकासकाकडून शाळा नव्याने बांधून घ्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली.
शिवसेना नगरसेवक प्रमोद सावंत यांनी जोगेश्वरी गुंफा गुजराती शाळेचा हरकतीचा मुद्दा मांडला. जोगेश्वरी गुंफा गुजराती शाळा ही 30 वर्षे जुनी शाळा भाडेतत्त्वावर होती. ही शाळा 2009 पासून बंद आहे. शाळेचे क्षेत्रफळ 2600 स्केअर फूट असून त्यात आठ वर्गखोल्या आणि तीन उर्दू तर तीन गुजराती वर्ग होते. या शाळेसाठी एस. पी. श्रीवास्तव यांना पालिकेकडून सहामाही भाडे धनादेशाद्वारे देण्यात येत होते. परंतु सध्या हे धनादेश परत येत आहेत.
23 फेब्रुवारी 2010 रोजी शाळेच्या जागेवर वेलकम को-ऑप. हाऊसिंग सोसायटी या नावाने ओमकार डेव्हलपर्स या विकासकासोबत करारनामा झाला. त्यावेळी शाळेच्या ठिकाणी बालवाडी दाखविण्यात आली. 8 जून 2016 रोजी ऍनेक्शर तयार करण्यात आला, यामध्ये शाळेचा समावेश करण्यात आला नाही, अशी माहिती प्रमोद सावंत यांनी दिली. शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.

























































