
मागील वर्षापासून राज्य शासनाच्या वतीने गणेशोत्सव ’राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर यावर्षी गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत उत्सवाच्या तयारीचा आढावा घेऊन प्रशासनाला विविध महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले.
बैठकीत जिल्हाधिकारी, महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पोलीस, उद्योग, पर्यटन, शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य विभागांनी आपापसात समन्वय साधून एकसंध कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना सांस्कृतिक मंत्री ऍड. आशिष शेलार यांनी प्रशासनाला दिल्या. यासह पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी शाडूच्या मूर्ती तयार करणाऱया कलाकारांना प्रोत्साहन देणारे व राज्यभर सामाजिक जनजागृती मोहीम चालवण्यासाठी विशेष उपक्रम राबवावेत तसेच गणेशोत्सव राज्य महोत्सवासंदर्भातील आवश्यक शासन निर्णय (जीआर) तातडीने अंतिम करण्याचे निर्देशही ऍड. शेलार यांनी यावेळी दिले.
या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगन, जिल्हाधिकारी आँचल गोयल, उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग वाढवणे, शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम घेणे आणि हस्तकला प्रदर्शनांद्वारे स्थानिक कारागीरांना व्यासपीठ मिळवून देणे.
मराठी मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि तज्ञ व्यक्तींचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करून राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा व लोककला संवर्धन कार्यक्रमांना व्यापक स्वरूप देणे.
महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावी ओळख मिळवून देण्यासाठी नियोजनबद्ध उपक्रम राबवणे.

























































