अमित शहांना भेटण्यासाठी उठ सूट फेऱ्या मारू नका; दिल्लीत मोठं चक्रिवादळ आहे, संजय राऊत यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या मंत्र्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या वाढवलेल्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे, त्यावरुन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाढता जनक्षोभ आणि देशातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था पाहता, मंत्र्यांच्या सुरक्षेत केलेली ही वाढ अत्यंत गरजेची आणि दूरदर्शी आहे. वादळाशी खेळू नका, विशेष म्हणजे जे गद्दार आहेत मग ते मंत्री असतील, खासदार असतील आमदार असतील त्यांनी तर कोणताच धोका पत्करु नये असा सल्ला देत उठ सुट गृहमंत्री अमित शहांना भेटण्यासाठी दिल्लीत फेऱ्या मारु नका, दिल्लीत सगळ्यात मोठं चक्रिवादळ असल्याचा जबरदस्त टोला संजय राऊत यांनी लगावला.

संजय राऊत यांनी शुक्रवारी केलेल्या ट्विटबाबत विचारले असता ते म्हणाले, एक बातमी काल वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती की, देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांची सुरक्षा वाढवली. का बरं त्यांना सुरक्षा वाढवावी लागली? सर्वच मंत्र्यांना व्हाय प्लस, झेड़ अशाप्रकारची सुरक्षा आहे. काही लोकांनी स्वत:चे बॉडीगार्ड ठेवलेले आहेत. जर तुम्ही उपमुख्यमंत्र्यांचा ताफा बघाल ठाण्याकडे जाताना किंवा ठाण्यातून निघताना तर एवढा ताफा पंतप्रधान किंवा अमित शहांचाही नाही आहे. तरीही जर देवेंद्र फडणवीस या सर्वांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला असेल तर तो फडणवीस यांच्या गृहमंत्री म्हणून कारकिर्दीतला आतापर्यंतचा अत्यंत दूरदृष्टीचा निर्णय आहे. मी तर व्हिजनरी निर्णय म्हणतो.

महाराष्ट्रातले नव्हे देशातले वातावरण अत्यंत बिघडलेले आहे. सरकारविरोधी आहे. सरकारच्या लोकांना, मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना पदोपदी धोका आहे. त्यांमुळे मंत्र्यांनी उगाच बाहेर फिरु नये. आमदार, खासदारांनी सुद्धा बाहेर शहाणपणा करुन बाहेर फिरायला जाऊ नये, उगाच कार्यक्रम घेऊ नये. बाहेर वादळ घोंगावतय. वादळाशी खेळू नका, विशेष म्हणजे जे गद्दार आहेत मग ते मंत्री असतील, खासदार असतील आमदार असतील त्यांनी तर कोणताच धोका कोणत्याही प्रकारचा पत्करु नये. लोकांच्या नजरेत सुद्धा पडू नये त्यांनी. फार गंभीर परिस्थिती आहे, वातावरण चिघळलेलं आहे. मी एका मानवतेच्या भावनेने सांगतो असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले, काही अघटीत घडू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षा वाढवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो चांगला आहे. अजून जर त्यांच्या सुरक्षेसाठी आर्मी आणता आली तर केंद्र सरकारकडे लष्कराची पण मागणी केली पाहिजे. काल आपण शिवाजी पार्कला पाहिले असेल कसे वादळ घोंगावत होतं. पुण्यात, नाशिकला पाहिले असेल कसे वादळ घोंगावत होतं आणि परत मी हेही सांगेन उठ सुट अमित शहांना भेटण्यासाठी दिल्लीत फेऱ्या मारु नका. दिल्लीत सगळ्यात मोठं चक्रिवादळ आहे. नजरेस कोणाच्या पडू नका, या लोकांनी भूमिगत व्हायला पाहिजे. दिल्लीत जाल तर काहीतरी गडबड होईल .तुमच्यावर सर्वांचा लक्ष आहे सगळ्यांवर. ज्यांनी ज्यांनी या देशाशी बेईमानी केली, जनतेशी बेईमानी केलेली आहे. त्यांच्या जीवाला आणि त्यांच्या मालमत्तेला धोका आहे. त्यामुळे देवेंद्रजींनी जो निर्णय घेतलेला आहे. पहिला व्हिजनरी निर्णय की सर्व मंत्र्यांची, खासदार आमदारांची सुरक्षा व्यवस्था वाढवायची त्याचे मी स्वागत करतो असेही संजय राऊत म्हणाले.

तो विषय आता राष्ट्रीय झालाय

पेपरफुटीला जबाबदार असलेले धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जसा जंतरमंतरवरचे आंदोलक मागत आहेत किंवा देशभरात जे मोर्चे निघत आहेत. ती तरुण मुलं मागत आहेत. त्याचप्रमाणे या देशातला लोकसभेतला, राज्यसभेतला प्रत्येक विरोधी पक्ष देखिल मागतोय. त्याच्यावर संसदेतीत दोन्ही सभागृहं बंद पडतायत, त्याच्यावरती काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी आंदोलन केले आहे, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे आंदोलन करतायत. त्यामुळे हा विषय आता कॉक्रोच जनता पार्टी पुरता मर्यादित राहिलेले नाही. हा विषय आता राष्ट्रीय विषय झालेला आहे. धर्मेंद्र प्रधान तुमचा कोण लागतो की त्याला तुम्ही एवढे वाचवताय? एवढा अहंकार कशासाठी आहे हे स्पष्ट व्हायला पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्यांना घ्यावाच लागेल असे संजय राऊत म्हणाले.