मोदींना स्वत: जावे लागेल या भीतीपोटी शेवटी केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेतला, संजय राऊत यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत अखेर आपला राजीनामा दिला आणि विद्यार्थ्यामध्ये देशभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बातमीनंतर आता शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाही या देशामध्ये मृतप्राय झाली होती. त्या लोकशाहीला जीवदान देणारी ही आजची घटना आहे. एका भ्रष्ट मंत्र्याला केंद्रीय मंत्रिमंडळातून मोदींना अखेर घालवावं लागलं. नाहीतर मोदींना स्वत: जावे लागेल या भीतीपोटी शेवटी केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेतला, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले की, यांच्या आंदोलनाला परदेशातून पैसे येतायत, अशा प्रकारच्या बातम्या पेरल्या गेल्या. आणि हे आंदोलन आम्ही चिरडून टाकू अशाप्रकारची एक मस्ती सरकारमध्ये होती. बारा वर्षामधलं हे एक असं आंदोलन झालं की, प्रथमच यामुळे केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. लोकशाही या देशामध्ये मृतप्राय झाली होती. त्या लोकशाहीला जीवदान देणारी ही आजची घटना आहे आणि त्याबद्दल या देशातील तरुण वर्गाचं अभिनंदन करावं तितंक थोडंच.

पुढे ते म्हणाले की, केवळ दिल्लीतच नाही तर देशभरात आंदोलन झालं. पाटणात सगळ्यात मोठं आंदोलन दुपारनंतर सुरु झालं. त्यानंतर दिल्लीत पुन्हा एकदा जंतरमंतरवर अश्रू धुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तरीही विद्यार्थी पुढे सरकू लागले आणि त्यानंतर हा राजीनामा झाला. उद्या 26 जुलै रोजी मुंबईमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा निघणार होता. देशभरात ते लोण पसरलं. पण सरकारला उशीरा का होईना जाग आली. त्यासाठी अनेक विद्यार्थ्यांची डोकी फोडावी लागली, रक्त सांडावी लागली, हाडं मोडून घ्यावी लागली. दुर्देवाने हे घडलं पण त्याचं फळ चांगलं मिळालं असंही संजय राऊत म्हणाले. पुढे ते म्हणाले की, एक भ्रष्ट मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळातून त्याला मोदींना अखेर घालवावं लागलं. नाहीतर मोदींना स्वत: जावे लागेल या भीतीपोटी शेवटी केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेतला अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.