
पाण्यावर उतरण्याचा प्रयत्न करताना सीप्लेन खडकांवर आदळून दुर्घनाग्रस्त झाले. कोसळल्यानंतर विमानाला आग लागली. विमानात पायलटसह 11 जण होते. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र सर्वजण जखमी झाले आहेत. जखमीपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात कॅनेडियन सीमेजवळ ही घटना घडली.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, वॉशिंग्टनमधील निर्जन सुसिया आयलंड स्टेट पार्कजवळ हे सीप्लेन कोसळले. अपघातात अनेक प्रवाशांना डोक्याला दुखापत झाली असून त्यांची हाडे मोडली आहेत. एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. गुरुवारी संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. विमानात एक पायलट आणि 10 प्रवासी होते. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विमान पाण्यावरून खूप कमी उंचीवर उडताना दिसत आहे. ते अचानक एका बाजूला कलले आणि फक्त एका फ्लोटच्या साहाय्याने पाण्याला स्पर्श केला. त्यानंतर विमान क्षणभर पुन्हा हवेत वर गेले, पण नियंत्रण सुटल्याने ते जमिनीवर कोसळले. दुर्घटनेवेळी समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटी होत्या. त्यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढले.





























































