
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांचे आणि आंदोलकांचे अभिनंदन केले आहे. मात्र, “विजयानंतर नम्रता राखणे सर्वात महत्त्वाचे असते. केवळ एखाद्या मंत्र्याच्या राजीनाम्याने देश घडत नाही, तर त्यासाठी शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा होण्याची गरज आहे,” असे वांगचुक म्हणाले आहेत. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयातून प्रसारमाध्यमांशी बोलताना वांगचुक यांनी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने मिळवलेल्या या यशाबद्दल तरुणांचे कौतुक केले. ते म्हणाले की, “सरकारने आणि धर्मेंद्र प्रधान यांनी उचललेल्या या पावलाचे मी स्वागत करतो आणि आदर राखतो. देशातील सर्व नागरिकांचे मी अभिनंदन करतो, कारण आज आपण लोकशाहीचा विजय पाहिला आहे. भविष्यातही आपल्याला अशाच प्रकारे हिंदुस्थानातील लोकशाहीचे रक्षण करणे आवश्यक आहे.” आता या चळवळीने शिक्षण आणि प्रशासनातील दीर्घकालीन सुधारणांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
या ऐतिहासिक यशाचे श्रेय वांगचुक यांनी कॉकरोच जनता पार्टी (CJP), देशभरातील स्वयंसेवक, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना दिले. या मुद्द्याला सर्वप्रथम वाचा फोडणाऱ्या CJP टीमचे, विद्यार्थ्यांचे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशभरातील नागरिकांचे त्यांनी विशेष आभार मानले. आंदोलनादरम्यान अनेकदा तणावाची परिस्थिती निर्माण होऊनही विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी ज्या प्रकारे शेवटपर्यंत शांतता राखली, त्याचे वांगचुक यांनी विशेष कौतुक केले आहे.





























































