ते भ्रष्टाचाराचे आणि अक्षमतेचे प्रतीक, त्यांना जावेच लागणार होते; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर राहुल गांधींची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रधान यांना जावेच लागणार होते, ते भ्रष्टाचाराचे, शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे आणि अक्षमतेचे प्रतीक आहेत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. प्रधान गेले हे चांगलेच झाले, असे म्हणत त्यांनी हा हिंदुस्थानातील विद्यार्थ्यांचा आणि देशाच्या भविष्याचा मोठा विजय असल्याचे म्हटले आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

एकेकाळी संपूर्ण जगाला हिंदुस्थानच्या शिक्षण व्यवस्थेचा हेवा वाटायचा, आपल्यालाही त्याचा अभिमान होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून या व्यवस्थेवर जाणीवपूर्वक हल्ले केले जात असून तिचे खाजगीकरण आणि त्यावर कब्जा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे हे आंदोलन त्याच प्रवृत्तीविरोधातील एक तीव्र प्रतिक्रिया होती, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीकास्त्र सोडले. देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर आरएसएसने मिळवलेला ताबा हा एक मोठा चिंतेचा विषय असून, यासाठी जर पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असतील, तर तितकीच मोठी चूक आरएसएसचीही असल्याचे ते म्हणाले. आता शिक्षण व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी सरकारला तातडीने ठोस पावले उचलावीच लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

या ऐतिहासिक लढ्यासाठी राहुल गांधी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. विद्यार्थ्यांना जेव्हा कोणत्याही मदतीची गरज भासेल, तेव्हा आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असू, अशी ग्वाही त्यांनी दिली.