
कॉक्रोच जनता पार्टीच्या संसदेवरील धडक मोर्चावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. या लाठीचार्जनंतर देशभरात मोठा संताप व्यक्त केला. यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून या लाठीचार्जचे आदेश कुणी दिले असा सवाल केला आहे. तसेच साध्या कपड्यांमध्ये जे कुणी लाठीचार्ज करत होते ते नक्की पोलीस होते की स्वयंसेवक असा देखील सवाल त्यांनी या पत्रातून केला आहे.
”दिल्लीमध्ये शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पलेट गन्स, लाठीमार आणि अश्रूधुराचा वापर करण्यात आला. मी १९ वर्षांच्या साहिल लोचबला भेटलो. त्याच्यावर पॅलेट गनने गोळीबार करण्यात आला असून, कदाचित त्याला आपला एक डोळा गमवावा लागू शकतो. त्याचा गुन्हा काय होता? पेपरफुटी थांबवण्याची आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या भविष्याची मागणी करणे? अमित शहांना माझे दोन प्रश्न आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांवर पलेट गन्ससह लाठीचार्ज करण्यास मंजुरी दिली होती का? जर नसेल, तर ती कोणी दिली? आणि विद्यार्थ्यांना लाठ्यांनी मारहाण करणारे साध्या कपड्यांमधील लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांच्या तैनातीला कोणी परवानगी दिली होती? देश उत्तर मागतोय”, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.



























































