
छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित विजयी जल्लोषाला जेनझींनी तुफान गर्दी केली होती. मुंबईसह राज्यभरातील अनेक तरुण तरुणी हातात तिरंगा घेऊन शिवतीर्थावर मोठ्या संख्येने दाखल झाले होते. या तरुणाईला संबोधित करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशातील तमाम देशभक्तांना अभिवादन केलं. तसेच ”अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले आहेत. आता भाजप विरुद्ध भारत अशा संघर्षाची सुरुवात झालीय” असा एल्गार उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
”आज मी देशातल्या तमाम देशभक्तांना अभिवादन करत आहे. अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकलेले आहेत. संघर्षाची सुरुवात झाली आहे. हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा सुरू झालेला आहे. एका झुरळाने हुकुमशहाला नमवलं आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे. मला मोदीजींना सांगायचे आहे की, आतातरी देशाकडे लक्ष द्या. तुमचे मंत्री काम सोडून पक्ष फोडण्यात बिझी आहेत. त्यांना सांगा की आता देशाचं काम करा. अर्थमंत्री निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल, महागाईबद्दल बोलत नाही पण पेपरफुटीचे फायदे समजावून सांगतायत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग देशाच्या संरक्षणाची बोंब पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले. आपले रस्ता मंत्री इथेनॉलवर बोलतायत. मोदींना मला सांगायचं आहे की तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रीमंडळातून काढताना किती यातना झाल्या त्याहून कितीतरी जास्त यातना आपण ज्यांना श्रद्धांजली वाहिली त्या मुलांच्या कुटुंबियांना झाल्या आहेत. त्या यातना आम्ही विसरणार नाहीत. ही ठिणगी आता पडली आहे. देशभर वणवा पेटलाय”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
”काहीजण आम्हाला विचारतात निवडणूकीला तीन वर्ष आहेत अजून, अहो निवडणूका गेल्या खड्ड्यात. मोदींनी पाहिलंय आता की मतं चोरी करता येते पण माणसं चोरी करता येत नाही. मनं चोरता येत नाही. ही मनं आता पेटलेली आहेत. ही ठिणगी जागती ठेवणं आपल्या सर्वांचं काम आहे. आता भोंदूत्व स्वीकारणारे अंधभक्त मुलांना धमक्या देतायत. त्यांचे व्हिडीओ काढा आणि पोस्ट करा. जिथे सापडतील त्यांना राष्ट्रभक्ती शिकवा” असेही उद्धव ठाकरे यांनी तरुणांना सांगितले आहे.
”तरुणांनी देशाच्या इतिहासातलं सुवर्ण पान लिहलं आहे. तुमच्या शक्तीची एकजुटीची नोंद देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी झाल्याशिवाय राहणार नाही. पण आता आलेली ही जाग जाऊ देऊ नका. सत्ताधाऱ्यांची मस्ती सहन करू नका. देशाची शक्ती काय असते ते दाखवून दिलेल्या देशाला पुन्हा कुणाला कमजोर करू देऊ नका”, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी तरुणांना केले.

























































