
काळ्या समुद्रात आणि लगतच्या जलमार्गांत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, हिंदुस्थान सरकारने या भागात कार्यरत व्यापारी जहाजांवर काम करणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण सुरक्षा अॅडवायजरी जारी केली आहे. या परिसरातील सुरक्षा परिस्थिती अत्यंत अस्थिर बनली असून, जहाजांना क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांसारख्या गंभीर धोक्यांचा सामना करावा लागत आहे.
हिंदुस्थानी सरकारच्या माहितीनुसार, एप्रिल 2026 पासून या जलमार्गांमधील हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून, आतापर्यंत पाच हिंदुस्थानी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या धोकादायक भागांत काम करू इच्छिणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या नागरिकांना नोकरी स्वीकारण्यापूर्वी तेथील धोक्यांचे सखोल मूल्यांकन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्यांनी हे काम स्वीकारण्याचे ठरवले आहे, त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. खलाशांनी नोकरी स्वीकारण्यापूर्वी जहाजाचा नियोजित मार्ग, थांबण्याचे बंदर, सुरक्षा व्यवस्था, विमा संरक्षण आणि आपत्कालीन प्रतिसाद प्रक्रियांची संपूर्ण माहिती भरती करणाऱ्या संस्था आणि जहाज चालकांकडून मिळवावी. तसेच रोजगाराच्या अटी आंतरराष्ट्रीय सागरी मानकांनुसार आहेत आणि संकटकाळात वैद्यकीय सेवा, स्थलांतर, मायदेशी परतणे व नुकसान भरपाईची योग्य तरतूद आहे, याची खात्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाने खलाशांना आपल्या कुटुंबीयांच्या सतत संपर्कात राहून प्रवासाची माहिती देत राहण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय, सागरी प्रशासन महासंचालनालय आणि हिंदुस्थान सरकारच्या संबंधित प्राधिकरणांच्या मार्गदर्शक सूचनांचे नियमित पालन करावे. विशेषतः, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सागरी प्रशासन महासंचालनालयाने 23 जुलै, 2026 रोजी जारी केलेल्या ताज्या सुरक्षा मार्गदर्शक सूचनेचे पालन करण्याचा विशेष सल्ला देण्यात आला आहे. या भागात कोणत्याही आपत्कालीन किंवा दूतावासविषयक मदतीसाठी हिंदुस्थानी नागरिकांनी रशिया आणि युक्रेनमधील हिंदुस्थानच्या दूतावासांशी संपर्क साधावा. रशियातील हिंदुस्थानी दूतावासाचा आपत्कालीन संपर्क क्रमांक +7 9652773414 असा आहे, तर युक्रेनमधील हिंदुस्थानी दूतावासाचा संपर्क क्रमांक +38 0933559958 असा आहे.

























































