रॉड निर्मिती कारखान्यात भीषण स्फोट; 4 जण ठार, अनेकजण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रॉड निर्मिती कारखान्यात भीषण स्फोट होऊन यात चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनासह बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आसामच्या कचार जिल्ह्यात पांग्राम येथील ‘काडे ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपी’ कारखान्यात ही घटना घडली. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेवेळी अनेक कामगार कारखान्याच्या आत असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. गॅस सिलेंडर फुटल्यामुळे हा स्फोट झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.