
हिंदुस्थानची अव्वल स्क्वॉशपटू अनाहत सिंगने इतिहास रचला आहे. कॅनडातील नियाग्रा-ऑन-द-लेक येथे पार पडलेल्या वर्ल्ड स्क्वॉश ज्युनिअर चॅम्पियनशिप 2026 च्या मुलींच्या एकेरी अंतिम सामन्यात तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. यासह वर्ल्ड ज्युनिअर स्क्वॉश चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावणारी ती पहिली हिंदुस्थानी खेळाडू ठरली आहे. या ऐतिहासिक विजयासह तिने मुलींच्या विभागात गेल्या 13 वर्षांपासून चाललेली इजिप्तची एकछत्री सत्ता संपुष्टात आणली.
अंतिम सामन्यात अव्वल मानांकित 18 वर्षीय अनाहतने दुसऱ्या मानांकित इजिप्तच्या रुकाय्या सालेम हिचा थेट सेट्समध्ये 3-0 असा धुव्वा उडवला. अनाहतने पहिला सेत 11-3, दुसरा सेट 11-7 आणि तिसरा सेट 11-9 असा जिंकला. यापूर्वी 2005 मध्ये हिंदुस्थानच्या जोश्ना चिनप्पाने या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते.
ANAHAT IS WORLD JUNIOR CHAMPION 🏆 🇮🇳
SHE CREATES HISTORY BY BECOMING FIRST EVER INDIAN TO WIN THE WORLD JUNIOR TITLE 🥺
– Defeated Egypt’s Ruqayya Salem 3-0 in Finals
THE CURRENT & FUTURE OF INDIAN SQUASH! pic.twitter.com/JgAAVVosAV
— The Khel India (@TheKhelIndia) July 25, 2026
सीनिअर पीएसए टूरवर सध्या जागतिक क्रमवारीत 20 व्या स्थानावर असलेल्या अनाहतने या संपूर्ण स्पर्धेत आपले वर्चस्व राखले. स्पर्धेतील 6 सामन्यांमध्ये तिने केवळ दोनच सेट गमावले. तिने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या लिली विल्सनचा 3-0 असा पराभव केला. त्यानंतर हाँगकाँगच्या पुई यिन क्लो लो आणि मलेशियाच्या डॉईस ये सान ली यांचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
उपांत्यपूर्व फेरीत तिने हबीबा रिझकवरचा चार सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत 11-7, 11-5, 6-11, 11-9 असा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीमध्ये बार्ब सामेहवर 3-1 असा विजय मिळवला आणि अंतिम फेरीत रुकाय्या सालेमचा सरळ सेटमध्ये पराभव करत जेतेपद मिळवले.
इजिप्तचे 13 वर्षांचे वर्चस्व संपले
2011 पासून सलग 13 वेळा मुलींच्या एकेरीचे विजेतेपद इजिप्तच्याच खेळाडूंनी जिंकले होते. अनाहतच्या या ऐतिहासिक विजयाने इजिप्तची ही मालिका खंडित झाली आहे. तसेच 2010 मध्ये अमेरिकेच्या अमांडा सोभीने हे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर पहिल्यांदाच इजिप्तबाहेर ही ट्रॉफी गेली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी कैरो येथे झालेल्या ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अनाहतने कांस्यपदक जिंकून हिंदुस्थानची 15 वर्षांची पदकाची प्रतीक्षा संपवली होती. यंदा तिने एका पाऊल पुढे टाकत थेट विजेतेपदाला गवसणी घातली.

























































