रोखठोक – छळ छावणीच्या अंताकडे…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील मोदी-शहांची राजवट म्हणजे 12 वर्षे सुरू असलेली छळ छावणीच आहे. छळ छावणीचा अंत जवळ आला असे ‘जंतर मंतर’वर पडलेल्या ठिणगीने दिसते. मोदी-शहांची राजवट लोकशाही मार्गाने नाही, तर हरामखोरी करून आली. पुन्हा अशी हरामखोरी झाली तर ‘जंतर मंतर’ची झुरळे तुमचा मुसोलिनी करतील हा संदेश दिल्लीच्या आंदोलनातून मिळत आहे.

 

“हर सडक पर, हर गली में
हर नगर, हर गाव में
हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए
मेरे सीने में नहीं
तेरे सीने में सही
हो कहीं भी आग
लेकीन आग जलनी चाहिए”

दुष्यंत कुमारच्या ओळी प्रत्यक्ष कृतीत उतरताना दिल्लीच्या रस्त्यावर आता रोज दिसत आहेत.

1942 चे महात्मा गांधींनी पुकारलेले ‘चले जाव’ आंदोलनाचे प्रात्यक्षिक 20 जुलै रोजी ‘जंतर मंतर’ ते संसद मार्ग या दिल्लीच्या रस्त्यावर दिसले. 12 वर्षांत अंधभक्तीच्या गुंगीने ‘गार’ पडलेला मुडद्यासारखा देश त्या दिवशी उसळत होता. पोलिसांच्या लाठ्या खात, बंदुकींच्या नळ्यांची पर्वा न करता पुढे जात होता. या प्रवासात अनेक तरुणांची डोकी फुटली, हाडे तुटली, रक्तबंबाळ झालेले त्यांचे देह जमिनीवर पडले, पण कोणीही दयेची याचना केली नाही. “मारा, अजून मारा, पण मागे हटणार नाही” ही त्यांची जिद्द होती. आंदोलकांचे एक नेते सोनम वांगचुक यांना सरकारने जबरदस्तीने उचलून इस्पितळाच्या तुरुंगात फेकले, तरीही ज्याच्या संकल्पनेतून नीट पेपरफुटीविरुद्ध ही चळवळ उभी राहिली तो अभिजीत दीपके त्याच्या सहकाऱ्यांसह एका ट्रकवर स्वार होऊन पुढे निघाला आणि संसद भवनाच्या दारावर धडकला. मी त्या दिवशी दुपारी संसद भवनातून बाहेर पडलो. ‘शार्दूल’ दारापाशी आलो तेव्हा संसदेच्या सुरक्षा रक्षकांनी सांगितले, “बाहेर जाता येणार नाही. सर्व दरवाजे आतून बंद केले. मंत्र्यांनाही बाहेर जाता येणार नाही. ‘जंतर मंतर’वरील झुरळांचे आंदोलन संसदेच्या दारापर्यंत आलेय.” सुरक्षा रक्षक हे सांगत असताना बाहेरच्या घोषणा, गर्जना, आक्रोश यांचा कोलाहल ऐकू येत होता. अश्रुधुराच्या फुटलेल्या नळकांड्यांचा धूर संसदेच्या आत आला व अनेकांच्या डोळ्यांपुढे अंधारी आली. हे भयभीत करणारे चित्र पाहून देशाचे महान पंतप्रधान प्रचंड सुरक्षा व्यवस्थेच्या भिंतीआड लपून बाहेर सटकले. या कठीण प्रसंगी त्यांनी सर्व मंत्री, खासदार, अधिकाऱ्यांसोबत संसदेतच थांबायला हवे होते, पण युद्धभूमीवरून सेनापतीच पळाला. 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर अतिरेकी हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान वाजपेयी संसदेत होते व अतिरेकी हल्ला झाला म्हणून ते मागच्या दाराने पळाले नाहीत हे महत्त्वाचे. संकट समयी नेतृत्वाची कसोटी लागते, पण युद्ध हरण्याच्या कलेत पारंगत असलेले आपले पंतप्रधान एकतर लाखो विद्यार्थ्यांच्या मोर्चाला सामोरे गेले नाहीत. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळास भेटले नाहीत व जनतेचे लोंढे संसदेच्या दिशेने येत आहेत हे समजताच स्वत: पळून गेले. जनतेने हा महान देश किती कमजोर हाती सोपवला आहे?

भाडोत्री जयजयकार

भारताच्या इतिहासातील एक अभूतपूर्व आंदोलन जग सध्या अनुभवत आहे. सोनम वांगचुक यांनी दोन केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते गरम सुपाचा प्याला ओठाला लावून उपोषण सोडले याचा काहीच परिणाम ‘जंतर मंतर’सह देशातील आंदोलनावर झाला नाही. उलट तरुणांचे लोंढे मोठ्या संख्येने दिल्लीवर आदळत आहेत.

अमित शहा व त्यांच्या पोलिसांनी दिल्लीतील ‘मेट्रो’ वाहतूक बंद केली तरीही पोरं ‘दांडी यात्रा’ काढावी तसे ‘जंतर मंतर’ला पोहोचत आहेत. पंतप्रधान मोदी व त्यांच्या कारभाराविरुद्धचा हा संताप आहे. मोदी हे भारतात सर्वशक्तिमान, लोकप्रिय अजिबात नाहीत. मोदी परदेशात जातात तेव्हा त्यांच्या जयजयकाराचे नारे देणारे लोक भाडोत्री असतात, हे ‘जंतर मंतर’च्या आंदोलनाने सिद्ध केले. मोदी हे स्वत:च्याच जनतेला सामोरे जायला टरकतात. ते एक पळपुटे व संवेदनशून्य राज्यकर्ते आहेत. त्यांनी लहान मुलांना निर्दयपणे चिरडले हे जगाने पाहिले. त्यामुळे मोदी ज्यांना हीरो वाटतात त्यांचे मेंदू जर्जर झाले आहेत. या आंदोलनातले हीरो सोनम वांगचुक, अभिजीत दीपके, राहुल गांधी, केजरीवाल असे कोणीच नाहीत. हीरो तीच मुले आहेत जी आपले घरदार सोडून ‘जंतर मंतर’वर पोहोचली व तेथेच थांबून राहिली आहेत. छाती पुढे काढून पोलिसांच्या लाठ्या रोज खात आहेत. हे हजारो आंदोलक ऊन-पावसाची पर्वा न करता रस्त्यावर आहेत. त्यांना पडद्यामागे राहून दोन वेळचे जेवण, पाणी, औषधे पाठवणारे अनेक अज्ञात हीरो आहेत. अनेक माता-पित्यांनी आपली मुले आंदोलनात पाठवली. ज्या माता-पित्यांनी ‘नीट पेपर लीक’ घोटाळ्यात आपली मुले गमावली ते सर्व आई-बाप दुसऱ्यांच्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून आंदोलनात उतरले. ते सर्व माता-पिता या आंदोलनाचे हीरो आहेत. वांगचुक यांना उचलून नेल्यावर हे आंदोलन संपवल्याच्या भ्रमात सरकार राहिले, पण सेनापतीला नेले तरी हजारो विद्यार्थी दुसऱ्या दिवशी पुन्हा ‘जंतर मंतर’वर संसदेवर धडक मारण्यासाठी जमा झाले. ते सर्व विद्यार्थी सुपर हीरोपेक्षा कमी नाहीत. त्या दिवशी मोदी-शहांच्या पोलिसांनी व पोलिसांच्या वर्दीतील गुंडांनी पोरांना मरेपर्यंत मारले. तरीही तिसऱ्या दिवशी आपल्या ताज्या जखमा घेऊन ही पोरं पुन्हा ‘जंतर मंतर’वर पोहोचली. ते सगळेच जण नायक आहेत. गोदी मीडियाला ‘चले जाव’ सांगणाऱ्या त्या पोरांचे आभार मानावे तेवढे थोडेच. शेठजींच्या चमचेगिरीत दंग असलेल्या चॅनल्सची पर्वा न करता ‘यूट्यूब’ समाज माध्यमाच्या मार्गाने या आंदोलनाची आग जगभरात नेणारा प्रत्येक सायबर कार्यकर्ता आंदोलनाचा हीरो आहे. भाजपच्या आयटी सेलचा पाया उखडून फेकणारा या आंदोलनातील प्रत्येक ‘पोरगा’ हीरो आहे. या सगळ्या हीरोंनी मिळून भाजपच्या पराभवाची, मोदी-शहांच्या पलायनाची गाथा लिहिली. नरेंद्र मोदी हे अजेय नाहीत. 2029 च्या आधीच त्यांची जुलमी सत्ता संपलेली असेल. त्यांचे राज्य हे हिंदुत्वाच्या नावाने सुरू केलेली छळ छावणी होती. मागच्या 12 वर्षांत हिंदुत्व बदनाम आणि कमकुवत झाले. मोदी व त्यांचे निर्लज्ज मंत्रिमंडळ आता फार काळ टिकत नाही, हे स्पष्ट झाले.

एका मंत्र्यासाठी

धर्मेंद्र प्रधान या एका मंत्र्याला वाचवण्यासाठी मोदी-शहांनी दिल्लीच्या रस्त्यावर शेकडो मुलांची डोकी फोडली. हात-पाय तोडले. दिल्ली पोलिसांनी मुलींचा विनयभंग केला. मोदी हे स्वत: अशिक्षित आहेत व त्यांनी एक खोटी डिग्री (एम.ए. Entire Politics) स्वत:ची म्हणून पुढे आणली. मोदींची ही बोगस डिग्री समोर आणणारे गृहमंत्री अमित शहा आहेत. बनावट डिग्री प्रसिद्ध केल्याबद्दल सगळ्यात आधी देशाच्या गृहमंत्र्यांवरच खटला चालवायला हवा. स्वत: अमित शहा हे अर्धशिक्षित आहेत. त्यांचे चिरंजीव जय शहा हे कोणत्याही परीक्षेशिवाय भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाले. इंग्रजी-हिंदीतली दोन वाक्ये त्यांना धड बोलता येत नाहीत. या सगळ्या अशिक्षितांनी मिळून देशातील राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांचा घोटाळा केला. एका पिढीचे भवितव्य उजाड केले. आता जय शहा परदेशात, सर्व मंत्र्यांची मुले परदेशात, स्वत: मोदी-शहा कडेकोट बंदोबस्तात, पण न्याय व हक्कांसाठी लढणाऱ्या मुलांना ते निर्घृणपणे मारत आहेत.

जगात वणवा

‘जंतर मंतर’चे आंदोलन देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले. मुंबई, पाटणा, नागपूर, हैदराबाद, कोलकाता, पुणे, झारखंड, भुवनेश्वरात लोक मोठ्या संख्येने रस्त्यांवर उतरले. ‘विश्वगुरूं’ना हे सांगणे गरजेचे आहे की, लंडन, जर्मनी, न्यूयार्क, आयर्लंड येथेही भारतीय झुरळांच्या पाठिंब्यासाठी लोक रस्त्यावर आले. हा विद्रोह मोदी-शहांच्या हुकूमशाहीविरुद्ध आहे. या आंदोलनास आज नेता नाही. जेव्हा आंदोलनास नेता नसतो व लोक रस्त्यावर येतात तेव्हा क्रांती वाट चालत आहे आणि जुलमी राज्यकर्त्यांचा अंत जवळ आला असे मानायला हरकत नाही. या आंदोलनात आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे भाजपची सत्ता ही लोकशाही मार्गाने आलेली सत्ता नाही. गुन्हेगारी पद्धतीने, माफिया तंत्राचा वापर करून, सर्व घटनात्मक संस्थांना ‘ब्लॅकमेल’ करून, विकत घेऊन ओरबाडलेली सत्ता आहे. त्यांना आजही लोकभावनेची किंमत नाही. मोदी-शहा, सरन्यायाधीश, निवडणूक आयोगाला अजूनही असे वाटत असेल की, लोक विरोधात गेले तरी हरकत नाही. आम्ही यंत्रणा पोखरून, खासदार-आमदार विकत घेऊन पुन्हा सत्ता मिळवू, पण ते शक्य नाही. इटलीत मुसोलिनीची सत्ता जनतेने उलथवून लावली. मुसोलिनीला मारून भर चौकात फेकले. त्याच्या मृतदेहावर इटलीच्या जनतेने लघुशंका केली. इटलीच्या सध्याच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून मुसोलिनीच्या अंताची कहाणी भारतीय राज्यकर्त्यांनी समजून घेतली पाहिजे.

Twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]