जागर – निसर्गप्रेम : शोषणाचे नवे हत्यार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< मिलिंद वाटवे
[email protected]

ढासळता निसर्ग, धोक्यात आलेले वन्य प्राणी, जैवविविधता, काळजी वाटायला लावणारे पर्यावरणीय बदल यांची मोठ्या प्रमाणावर जाणीव व्हायला 1960 च्या दशकात सुरुवात झाली. त्यात समस्येचे स्वरूप आणि त्याची गंभीरता तळमळीने मांडणारे, त्यावर उपाय करू पाहणारे जसे एकीकडे होते तसे बदलत्या परिस्थितीकडे बारकाईने पाहणारे आणि त्याचा स्वार्थासाठी जास्तीत जास्त उपयोग करून घेणारेही होते.

भारतात 1970 च्या दशकात वन्य जीव संरक्षण कायदा आला. तो येण्याची आवश्यकता होतीच, पण दुसरीकडे त्याच बरोबर आणि त्याच्याच नावाखाली सामान्य माणसाच्या शोषणालाही लागलीच सुरुवात झाली, पण त्याकडे कुणाचं फारसं लक्ष गेलं नाही. बहुतेक निसर्गप्रेमींना त्याची गंधवार्ता आजही नाही. त्यामुळे आजतागायत अव्याहतपणे शोषण चालूच आहे. जंगलं राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अभयारण्यं निर्माण केली गेली. त्यासाठी आधी तिथल्या अनेक वस्त्या उठवल्या गेल्या. आजूबाजूच्या लोकांना जंगलातून काही गोळा करून नेण्यास किंवा जंगलात गुरे चारण्यास बंदी केली गेली. याचे समाजमनावर काय परिणाम झाले ते पाहणं आवश्यक आहे.

अभयारण्ये कुठे झाली, तर जिथे जंगले होती तिथे. म्हणजे ज्या गावातील लोकांनी आपल्या आजूबाजूचं जंगल राखलं होतं तिथे. अशीच गावं नेमकी उठवली गेली. यातून आपण हा संदेश दिला की, जे लोक जंगल राखतील त्यांची हकालपट्टी होईल. जे वेळीच विध्वंस करतील ते सुरक्षित आहेत. लोक अशा अनुभवांमधून हळूहळू शिकतच असतात. पुढे अल्पावधीत अभयारण्यांमध्ये प्राण्यांची संख्या वाढली. त्याहून महत्त्वाचं म्हणजे अनेक दशके म्हणजे रानडुकरांच्या डझनावारी पिढ्या, शिकारीचा अनुभव न घेतल्यामुळे त्यांची माणसाची भीती वेगाने नाहीशी होऊ लागली. मग हे प्राणी आजूबाजूच्या शेतांवर येऊन पिके खाऊ लागली. वन्य प्राण्यांमुळे पीक नुकसान झाल्याची भरपाई शेतकऱ्याला मिळावी असा कायदा तर आहे, पण त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया तितकीशी योग्य नाही. एका अभ्यासानुसार महाराष्ट्रात वन्य प्राण्यांमुळे होणारं शेतीचं प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष नुकसान वर्षाकाठी दहा हजार कोटींच्या पटीत आहे. नुकसान भरपाई मात्र संपूर्ण राज्यात मिळून वर्षाला पन्नास ते शंभर कोटींच्या घरातच दिली जाते.

यावर निसर्गप्रेमी एक ठरावीक उत्तर देतात ते म्हणजे “तुम्हीच त्यांच्या भूमीवर अतिक्रमण केल्यामुळे आता ते तुमच्या पिकांवर येतात.” वन्य प्राणी शेतकऱ्याचा सातबारा तपासून मगच येतात की काय? ज्यांची जमीन अतिक्रमणाची आहे त्यांचीच पिकं खातात की काय? बरं, फक्त जंगलांच्या भागातच शेतकऱ्यांचं नुकसान होतं अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. ज्या भागात जंगलं जवळपासही नव्हती, तिथेही आता रानडुक्कर, नीलगाय, चिंकारा, काळवीट पिकांवर येत आहेत, पण शेतकऱ्यांचं जगणं आपल्या प्राणिप्रेमामुळे असह्य होत असल्याची गंधवार्ताही शहरी निसर्गप्रेमी माणसाला नाही.

निसर्गप्रेमींचा दुसरा एक मोठा गैरसमज म्हणजे प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नाहीसा होत असल्यामुळे प्राणी पिकांवर येतात. असं असतं तर ज्या ठिकाणी जास्त जंगलतोड झाली आहे तिथे जास्त उपद्रव, ज्या ठिकाणी जंगले चांगली राखली तिथे कमी उपद्रव असं चित्र दिसायला हवं होतं. संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर जिथे नैसर्गिक अधिवास अधिक चांगले राखले तिथे शेतकऱ्यांचा त्रास अधिक असंच चित्र दिसतं. म्हणजे नैसर्गिक अधिवासाचा नाश हे काही पिकांच्या नासाडीचं कारण दिसत नाही आणि अधिवासांची काळजी घेतली तर समस्या कमी होते असा पुरावा नाहीच नाही.

शेतावर जागून राखण करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आता एक नवीनच समस्या उभी राहिली आहे ती म्हणजे अगदी अलीकडच्या काळात वाघ, बिबट्या, अस्वलांचे माणसावर वाढत चाललेले हल्ले. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत वाघांनी माणसावर हल्ले केल्याच्या घटना खूपच घडताहेत. इतर अनेक जिल्ह्यांमध्ये बिबटे, त्यांचं प्रमाण पाहिलं तर जिम कार्बेटच्या नरभक्षकांच्या नोंदींशी तुलना करण्याइतकं वाढलं आहे. याचे छोटे मोठे आर्थिक-सामाजिक परिणाम काय काय होतात याचा विचार कुणी केलाय? वाघाच्या भीतीचे अनेक आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिणाम होत असतात. याचा अभ्यास कोण करणार?

आपल्याला हव्या असलेल्या कुठल्याही गोष्टीसाठी काही किंमत मोजावी लागते हे सर्वमान्य तत्त्व आहे. वने आणि वन्य जीव राखण्यासाठी समाजाला काही किंमत चुकवावी लागली तर ती समाजाने मान्य केली पाहिजे, पण समाजाने म्हणजे कुणी? प्रत्यक्षात ज्या लोकांनी आपल्या गावाच्या आजूबाजूला जंगलं राखली तेच फक्त ही किंमत चुकवताहेत. ज्यांनी पूर्वीच जंगलांचा नाश केला ते सुखात आहेत. त्यांना किंमत चुकवावी लागत नाही. एवढंच नाही तर कुणीतरी अशी किंमत चुकवत आहे याची त्यांना सुतराम कल्पनाही नाही. याचा दीर्घकालीन परिणाम काय होईल तर निसर्गाच्या सान्निध्यात पिढ्यान्पिढ्या जगलेला माणूस बेघर होईल.

निसर्गप्रेमाइतका गुंगवून टाकणारा आणि आंधळं करणारा दुसरा आदर्शवाद नाही. शोषणकर्त्यांना वस्तुस्थिती शास्त्रज्ञांपेक्षा अधिक चांगली समजते आणि ते स्वार्थासाठी अत्यंत योग्य अशी भूमिका घेतात. निसर्गप्रेमाच्या आंधळ्या, भाबड्या, सद्हेतूपूर्ण भ्रमात आपण राहायचं आणि शोषणकर्त्यांना बळ द्यायचं की नाही हे सामान्य माणसाला विवेकाने ठरवण्याची वेळ आली आहे. निसर्ग आणि पर्यावरणवादाच्या नावाखाली अनेक भोंगळ गोष्टी लोकांच्या माथी मारल्या जात आहेत आणि त्याचा चतुराईने फायदाही घेतला जातोय. हे होऊ नये असं वाटत असेल तर शुद्ध विज्ञानाच्या पायावर निसर्गाचा अभ्यास उभा राहिला पाहिजे. आहे म्हणून जोपासला जात आहे.

निसर्गाच्या इतर अनेक क्षेत्रांतही वास्तव भान आणि विवेकाची गरज आहे. निसर्गप्रेम तर समाजात रुजणं आवश्यक आहेच, पण आंधळ्या निसर्गप्रेमामुळे निसर्गाचा आणि माणसाचा फायदा अधिक होईल की तोटा? या प्रश्नाचा आधी विचार करावा लागेल. वास्तवाची जाणीव, त्यातल्या गुंतागुंतीची जाणीव, प्रश्नांच्या वेगवेगळ्या बाजूंकडे पाहणे, चांगल्या वाईटाचे शिक्के मारून मोकळे न होणे, विज्ञानाच्या मूळ तत्त्वांचे भान राखून विज्ञानाच्या नावाखाली चाललेल्या प्रचाराला बळी न पडणे या गोष्टी सोप्या नाहीत, पण तेच तर निसर्गभानाचे खरेखुरे आव्हान आहे.

(लेखक अभ्यासक, संशोधक आहेत.)