
प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी यांनी नुकतीचएका टीव्ही शो मधे हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीतील संघर्ष, गाजलेल्या भूमिका आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक रंजक गोष्टींवर मनमोकळा संवाद साधला. कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपल्या कठीण काळातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांना मेकअप करताना ते आरशात स्वतःचा चेहरा का पाहत नाहीत हा प्रश्न विचारला असता त्यांनी यामागचे गमतीशीर उत्तर दिले.
मनोज वाजपेयी जेव्हा त्यांना विचारण्यात आले की ते मेकअप करताना आरशात स्वतःचा चेहरा का पाहत नाहीत, त्यावर त्यांनी मजेशीर अंदाजात उत्तर दिले की, बघण्यासारखे काहीच नसताना आरशात पाहून काय आनंद मिळणार, असे म्हणत त्यांनी आपल्या चेहऱ्याबद्दल गमतीशीर उत्तर दिले. तसेच, करिर्दीच्या सुरुवातीच्या अत्यंत कठीण काळात खिशात पैसे आणि पोटात अन्न नसताना गमावण्यासारखे काहीच नसते आणि मिळवण्यासाठी संपूर्ण आकाश असते, याच विचाराने आपल्याला प्रत्येक संकटाशी लढण्याची प्रेरणा दिली, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘सत्या’ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देताना मनोज वाजपेयींनी सांगितले की, या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना नव्या पद्धतीचे लेखन करणाऱ्या लेखकांची गरज होती. त्यावेळी आपण अनुराग कश्यपला या प्रकल्पाशी जोडले आणि आपला चांगला मित्र सौरभ शुक्ला यालाही संवाद लेखनासाठी सोबत आणले. तसेच, लोकप्रिय वेबसीरीज ‘द फॅमिली मॅन’मधील श्रीकांत तिवारी हे पात्र अधिक अस्सल व वास्तववादी वाटावे म्हणून आपण स्वतः त्यात अनेक बारकावे सुचवल्याचे त्यांनी नमूद केले. श्रीकांत तिवारी हा वाराणसीचा रहिवासी, दिल्ली विद्यापीठातून शिकलेला आणि यूपीएससी पास होऊन गुप्तचर विभागात गेलेला व्यक्ती असल्याने त्याची भाषा, वागणूक, शिवीगाळीचा स्वाभाविक वापर आणि उत्तर हिंदुस्थानी कौटुंबिक पार्श्वभूमी कशी असायला हवी, याचा सखोल अभ्यास करून आपण पात्राची रचना केल्याचे त्यांनी सांगितले.

























































