
इचोरी येथे अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेणाऱ्या मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली असून, पक्क्या रस्त्याचा अभाव आणि स्वतंत्र स्मशानभूमीच्या मागणीसाठी ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग सुस्थितीत नसल्यामुळे ग्रामस्थांना नाल्यातून, काट्याकुट्यातून, दगड-गोट्यांतून आणि पाण्यातून मार्ग काढत अत्यंत बिकट व वेदनादायी परिस्थितीत मृतदेह न्यावा लागत आहे. परिणामी, मृत्यूनंतरही मानवी देहाला सन्मानाने अंतिम निरोप देता येत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जाण्यासाठी कोणतीही सुस्थितीत वाट नसल्याने प्रत्येक वेळी अंत्ययात्रेदरम्यान नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. विशेषतः वृद्धांना या मार्गावरून जाताना मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेकजण जखमीही झाल्याचे सांगितले जात आहे. या गंभीर समस्येकडे शासन व प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. राष्ट्रीय नंद गवळी समाज संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने देऊन यदुवंशी नंद गवळी समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची मागणी करण्यात आली. मात्र, आजतागायत त्यावर निर्णय झालेला नाही.
स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने समाजबांधवांना अनेकदा नाल्याच्या काठावर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. ही केवळ मूलभूत सुविधांचा अभाव नसून मानवी संवेदनांची उपेक्षा असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रतिनिधींनी घटनास्थळी भेट दिली असता स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था दिसून आली. त्यामुळे शासनाने तातडीने स्मशानभूमीकडे जाण्यासाठी सर्व हंगामात वापरता येईल असा रस्ता तयार करावा, तसेच यदुवंशी नंद गवळी समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी, अन्यथा तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


























































