
ज्येष्ठ पत्रकार उत्तम ऊर्फ भास्कर वाडकर यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. उत्तम वाडकर यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
मागील काही महिन्यांपासून उत्तम वाडकर यांच्या प्रकृतीत चढउतार सुरू होते. त्यातच शनिवार, 25 जुलै रोजी त्यांचे लहान बंधू उदय वाडकर यांचे निधन झाले. भावावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर अवघ्या बारा तासांतच उत्तम यांचीही प्राणज्योत मालवली. दोन्ही भावांच्या निधनाने वाडकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पत्रकारांमध्ये ‘बापू’ नावाने परिचित असलेल्या उत्तम वाडकर यांनी सुरुवातीच्या काळात शिवसेनेचे सावंतवाडी व दोडामार्ग तालुकाप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती. नंतर ते पूर्णवेळ पत्रकारितेत सक्रिय झाले. दैनिक ‘सामना’चे प्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांनी स्वतःचे साप्ताहिक ‘कडेलोट’ सुरू केले. साप्ताहिक संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते. सिंधुदुर्ग प्रेस क्लबचे अध्यक्षपदही वाडकर यांनी भूषवले होते. त्यांना ‘प्रेस क्लब भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
























































