
<< विनायक
निसर्गचक्र निर्हेतुकतेने सतत फिरत असतं. अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर वगैरे गोष्टी या आपल्याला जाणवणाऱ्या परिणामांचा भाग. हेतू नसलेल्या निसर्गाला त्याचे काय? तरीसुद्धा या ऋतुचक्राचा पिढ्यान्पिढ्या बारकाईने अभ्यास करून माणसाने काही ठोकताळे बांधले. भरपूर पाऊस पडणारा प्रदेश कोणता, पर्जन्यछायेतील कोणता आणि दुष्काळी कोणता, याचं साधारणपणे वर्गीकरण झालं. या स्तंभातून आपण अनेकदा वाचलंय की, हिंदुस्थानात पावसाळा हा संपूर्ण चारमाही ऋतू आहे. चीन-जपानमध्ये तर वर्षभर कुठे ना कुठे पाऊस पडत असतो. श्रीलंका, सिंगापूर, इंडोनेशिया आणि विषुववृत्तावरच्या अनेक देशांत आभाळातील जलवृष्टी होतच असते. आपल्याकडे मात्र जून ते सप्टेंबर असा बरोबर 4 महिने किंवा एक तृतीयांश वर्ष पाऊस होतो.
गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत पावसाळा खरोखरच नेमेचि यायचा. ‘नेमेचि येतो मग पावसाळा; हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’ अशी कवितासुद्धा होती. अशा यशवंत मनोहरांच्या हृदय कवितेत म्हटल्यानुसार ‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही’ अशी खंत व्यक्त करण्याचा काळ निसर्गाने आणला आहे. महाराष्ट्रात किंवा देशात परंपरेने जो भाग दुष्काळी आहे तिथली स्थिती सार्वत्रिक अवर्षणाच्या काळात तर अधिकच बिकट होते. या देशाने इतिहासकाळापासून अनेक भीषण दुष्काळ आणि अतिवृष्टी, महापूर पाहिले आहे. लाखो लोकांचे बळी घेणाऱ्या ओल्या-कोरड्या दुष्काळांची मालिका स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही सुरू होती.
त्यानंतर इंदिरा गांधींच्या काळात आपल्या महाराष्ट्राचे अण्णासाहेब शिंदे केंद्रीय कृषी/ राज्यमंत्री असताना पीकपाण्याची परिस्थिती सुधारण्याला गती आली. 1968 मध्ये देशातलं गव्हाचं उत्पादन पूर्वीच्या 12 दशलक्ष मेट्रिक टनांवरून एकदम 17 दशलक्ष मेट्रिक टनांवर गेलं आणि केंद्र सरकारने ‘गहू क्रांती’वर पोस्टाचं विशेष तिकिट प्रसिद्ध केलं. तोपर्यंत आपल्याला अमेरिकन ‘पब्लिक लॉ फोरएटी’ अंतर्गत निकृष्ट धान्य पुरवणाऱ्या अमेरिकेला तो मोठा धक्का होता. त्या काळचा तो अमेरिकन ‘लाल’ गहू आमच्या पिढीने पचवला आहे.
पावसाळी ऋतूचा देश म्हटला की पीकपाण्याची सारी भिस्त पावसावरच. असा किती पडतो पाऊस दरवर्षी जगभर आणि आपल्या देशात, तसेच महाराष्ट्रात? ढोबळमानाने काही आकडे जाणून पाहूया. आधी विचार जगाचा. कारण ऊन, पाऊस, वारा यांना देशांच्या सीमा ठाऊक नसतात. ती माणसांची कृत्रिम योजना असते. निसर्गाची लहर सब घोडे बारा टके न्यायाने कार्य करते. कुठे भरमसाट पाऊस तर कुठे वर्षानुवर्षे दुष्काळ हे केवळ निसर्गाच्या जाणीवशून्य प्रक्रियेतून घडतं. त्यावर जाणिवेच्या प्रतिक्रिया आपण देतो, कारण सुकाळ आपल्याला सुखावतो आणि दुष्काळ हैराण करतो.
प्रतिवर्षी पृथ्वीवर पडणाऱ्या पाण्याची गणना करायची तर त्याचं परिमाण आहे क्विंटिलियन. म्हणजे एकावर 18 शून्य. असं 190 क्विंटिलियन पाणी पृथ्वीवर सर्वत्र बरसतं. किलोमीटरचा हिशेब केला तर 56,000 घनकिलोमीटर एवढं पाणी समुद्राच्या वाफेचे ढग होऊन आकाशात जाऊन थंड झाल्यावर जगाला मिळतं. हे प्रमाण कमी नाही.
आपल्या देशाच्या भूभागावर ही 4 वर 15 शून्य द्यावी लागतील इतके लिटर पाणी पाऊस देतो. अर्थात तो योग्यरीतीने पडला तर. महाराष्ट्रातील बऱया पावसाचं प्रमाण वार्षिक 163 ट्रिलियन लिटर किंवा 5780 टीएमसी एवढं होतं. एक टीएमसी पाण्यात 23,000 एकरवर 1 फूट पाणी साचेल एवढा जलसाठा असतो. हे पाणी खूप कमी नाही. यातील आकडेवारीत फरक असू शकतो. पाण्याचं अगदी तंतोतंत मोजमाप जलतज्ञच सांगू सकतील. पण आपला मुद्दा असा की, जगात देशात किंवा आपल्या राज्यात पाणी कमी बरसतं का? तर नकारार्थी येईल. मग ‘दुष्काळी भाग’ कसा? याचं उत्तर पावसाचं पाणी विविध भागांत (अगदी जगभर) सारखंच पडत नसतं यात आहे. प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती, उष्णता, वनं-अरण्यांचा भाग, पर्वतीय भाग, वाळवंट, मोसमी वारे, उष्णता अशा कितीतरी गोष्टी पाऊस आणायला किंवा न आणायला कारणीभूत ठरतात.
यामुळे ‘एल निनो’सारखा फटका बसला की आपला पाऊस गायब होतो. जुलैच्या सुरुवातीला बरसून त्याने हजेरी तेवढी लावली. आता फरार झालाय. यावर उपाय काय? प्रतिवर्षी पृथ्वीवर पुरेसं पाणी समुद्र देणारच. हे नैसर्गिक उर्ध्वपातन (डिसॅलिनेशन) सुरूच राहणार. परंतु पाऊस आपल्याच भूभागावर पडेल याची शाश्वती कोणीच घेऊ शकत नाही. ढग नसतील तर कृत्रिम पाऊस तरी कसा पडणार? ‘आडातच नसेल तर पोहऱ्यात (पाणी) कुठून येणार?’ या म्हणीसारखंच… पण आकाशाच्या आडात (जलसाठ्यात) पाणी असणारच. ते आपल्या ‘पोहऱ्यात’ किंवा भूभागात पडण्यासाठी किंवा जिथे पडेल तिथला थेंब न् थेंब साठवण्याची योजना जगभर तातडीने अमलात आणावी लागेल. कारण पाऊस नाही तर पीकपाणी नाही. नुसत्या चर्चेने पाऊस हवा तेव्हा हवा तसा पडणार नाही. त्याला आहे तिथे ‘पकडण्याचं’ आणि हवं तिथे वाहतं करण्याचं कार्य सर्वात आधी केलं तरच देश (आणि जग) खऱ्या अर्थाने सुजलाम् सुफलाम् होईल. विचार प्रत्येकाने करायचा आहे.



























































