
नीट पेपरफुटीविरोधात जेन झी क्रांती घडली. ‘जंतर मंतर’सह देशाच्या कानाकोपऱ्यात आंदोलन झाले. त्यापुढे मोदी सरकारला झुकावे लागले आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. या विजयाचा जल्लोष आज दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना नेते – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे यावेळी उपस्थित होते. यानिमित्ताने शिवतीर्थावर देशभक्तीचे तुफान उसळले. तरुणाईचा महासागर लोटला. राष्ट्रगीत आणि तिरंग्याच्या साक्षीने जेन झी क्रांतीचा ‘न भूतो’ असा जयजयकार झाला.
आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली
नीट पेपरफुटीनंतर देशभरात 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. राज ठाकरे यांनी सर्व मुलांची नावे वाचून दाखवली. आंदोलनाला यश आले, आपण उत्साह साजरा करू, पण त्यासोबत या विद्यार्थ्यांसाठी आपण काही क्षण मौन बाळगू, असे राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर एक मिनिट सर्वांनी मौन बाळगून या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण केली.


























































