
जेन-झी आंदोलनाचा दणका बसल्यानंतर केंद्र सरकार खडबडून जागे झाले आहे. पेपरफुटीविरोधात कठोर कायदा आणल्याची घोषणा केल्यानंतर आता परीक्षा पद्धतींमध्ये सुधारणा करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्राम व्हिडीओ शेअर करून आज ही घोषणा केली. ‘आपली परीक्षा पद्धती विश्वसनीय, पारदर्शक, तंत्रज्ञानस्नेही असावी असा सरकारचा प्रयत्न आहे. हा टास्क फोर्स त्यादृष्टीने अभ्यास करेल व आपल्या शिफारशी सादर करेल. त्या अहवालाच्या आधारे परीक्षा पद्धतीत बदल केले जातील, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. ‘विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हिंदुस्थान सरकार अनेकविध पावले उचलत आहे. ज्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी खेळ केला, ते तुरुंगात खितपत पडले आहेत, असे ते म्हणाले.
पेपरफुटीविरोधात आज नवे विधेयक
पेपरफुटी व परीक्षांतील घोटाळे रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी असलेले विधेयक आम्ही सोमवारी संसदेत मांडणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.























































