मीराबाईची सुवर्ण हॅटट्रिक! सलग तिसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत नंबर वन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने अपेक्षेप्रमाणे दमदार कामगिरी करत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ४८ किलो गटात एकूण १९० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेतील तिचे हे सलग तिसरे सुवर्णपदक असून, हिंदुस्थानच्या खात्यातील या स्पर्धेतील हे पहिले सुवर्ण ठरले. तिच्या या यशामुळे हिंदुस्थानची एकूण पदकसंख्या आता तीन झाली आहे.

३१ वर्षीय मीराबाईने स्नॅच प्रकारात सुरुवातीला ८२ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवत, तिने तिसऱ्या प्रयत्नात ८५ किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धेचा नवा विक्रम नोंदवला. या स्पर्धेत नायजेरियाच्या रूथ असुओको न्योंग हिला रौप्य, तर मलेशियाच्या आयरीन जेन हेन्री हिला कांस्यपदक मिळाले. क्लीन अँड जर्क प्रकारात तिला सुवर्ण निश्चित करण्यासाठी १०५ किलो वजन उचलणे आवश्यक होते. पहिला प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तिने यश मिळवले आणि सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.

ऋषिकांत सिंहला रौप्य

त्याआधी, हिंदुस्थानच्या ऋषिकांत सिंहने रौप्यपदक जिंकले. वेटलिफ्टिंगमध्ये हिंदुस्थानने आतापर्यंत दोन पदके जिंकली असून, पुरुषांच्या ६५ किलो गटात एम. राजा याच्याकडून आणखी एका पदकाची अपेक्षा आहे.