
हिंदुस्थानी क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मुंबईतील रिअल इस्टेटमध्ये आणखी एक मोठी गुंतवणूक केली आहे. या सेलिब्रिटी जोडप्याने वर्सोवा येथील ‘गोदरेज स्कायशोर’ या आलिशान निवासी प्रकल्पात ₹18.29 कोटी किमतीचा फ्लॅट खरेदी केला आहे. अलिबागमध्ये सुमारे ₹37.86 कोटी किमतीची जमीन खरेदी केल्यानंतर त्यांची ही आणखी एक महत्त्वाची गुंतवणूक मानली जात आहे.
प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म Zapkey.com ला मिळालेल्या कागदपत्रांनुसार, हा फ्लॅट 2,644 चौरस फूट क्षेत्रफळाचा असून तो इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर आहे. यामध्ये 316 चौरस फूट अतिरिक्त जागा आणि तीन कार पार्किंगची सुविधा आहे. या मालमत्तेची नोंदणी 21 जुलै रोजी झाली असून त्यासाठी ₹1.09 कोटी मुद्रांक शुल्क भरले आहे. या व्यवहारानुसार फ्लॅटची किंमत ही ₹69,159 प्रति चौरस फूट इतकी आहे. असे वृत्त आज तक ने दिले आहे.
मुंबईतील कोस्टल रोड नॉर्थ प्रकल्पामुळे वर्सोवा परिसराची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. सुधारित कनेक्टिव्हिटीमुळे वर्सोवा आता सेलिब्रिटी, उद्योगपती आणि उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांची पसंती बनत असून, मुंबईतील प्रमुख लक्झरी निवासी ठिकाणांमध्ये त्याची गणना होऊ लागली आहे.
रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या मते, कोस्टल रोडमुळे वांद्रे, खार, सांताक्रूझ, जुहू, अंधेरी, वर्सोवा, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, मीरा रोड आणि भाईंदर या पश्चिम उपनगरांतील मालमत्तांच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई आणि प्रमुख व्यावसायिक केंद्रांशी जलद संपर्क उपलब्ध झाल्याने या भागांतील घरांच्या किमती आणि गुंतवणुकीचे आकर्षण वाढत आहे.
यापूर्वी विराट आणि अनुष्का यांनी अलिबागमधील झिराड गावात 5 एकरांहून अधिक क्षेत्रफळाची जमीन ₹37.86 कोटींना खरेदी केली होती. जानेवारीमध्ये नोंदणीकृत झालेल्या या व्यवहारात ₹2.27 कोटी मुद्रांक शुल्क भरले गेले होते. याआधी 2022 मध्येही या जोडप्याने फार्महाऊस उभारण्यासाठी अलिबागमध्ये सुमारे 8 एकर जमीन खरेदी केली होती. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील त्यांची सातत्यपूर्ण आणि मोठ्या प्रमाणातील गुंतवणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
























































