
नीट पेपरलीक प्रकरणात तरुणांनी आंदोलन केले आणि शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला व अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र, ‘जेन झी’ पिढी सरकारच्या दडपशाहीविरोधात लढली आणि तिने विजय मिळवला. ‘सीजेपी’च्या (CJP) या धाडसाने प्रेरित होऊन ‘ई-२० जनता पक्ष’ नावाचा एक नवीन गट स्थापन झाला आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’नंतर आता ‘ई-२० जनता पक्षा’ची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘ई-२० जनता पार्टी’ या नवीन गटाने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याच्या धोरणाला तीव्र विरोध करत थेट रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हा पक्ष सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर वेगाने लोकप्रिय होत असून, काही तासांतच याचे हजारो फॉलोअर्स वाढले आहेत.
इथेनॉलमिश्रित पेट्रोल वापरण्याची वाहनचालकांवर कोणतीही सक्ती नसून, त्यांना 100% शुद्ध पेट्रोल खरेदी करण्याचा कायदेशीर पर्याय उपलब्ध करून दिला जावा, ही या पक्षाची मुख्य मागणी आहे. या पक्षाने कोणतीही सबसिडी किंवा मोफत पेट्रोल मागितलेले नसून, फक्त ग्राहकांना आपल्या पसंतीचे इंधन निवडण्याचे स्वातंत्र्य मिळावे, अशी भूमिका मांडली आहे. तसेच पेट्रोल पंपवर कोणत्या प्रकारचे इंधन उपलब्ध आहे आणि त्यात किती टक्के एथेनॉल आहे, याची स्पष्ट माहिती आणि लेबलिंग असल्याचे म्हटले आहे. याशिवाय इंधनामुळे इंजिनवर होणारा परिणाम, मायलेजमधील घट आणि मेंटेनन्सच्या खर्चावर स्वतंत्र संशोधनाचा (Independent Research) अहवाल जनतेसमोर मांडण्यात यावा, अशी देखील मागणी केली आहे.
दरम्यान, या पक्षाला सामान्य नागरिकांसह व्यावसायिक वाहतूकदारांचीही मोठी साथ लाभली आहे. ‘दिल्ली टॅक्सी आणि टूरिस्ट असोसिएशन’ने या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत आगामी 4 ऑगस्ट रोजी संसदेच्या दिशेने एक भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. असोसिएशनच्या मते, इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे गाड्यांचे मायलेज झपाट्याने कमी झाले असून देखभालीचा (मेंटेनन्सचा) खर्च वाढला आहे. विशेषतः जुन्या गाड्यांची इंजिने यामुळे खराब होत आहेत.























































