दुपारच्या जेवणानंतर येणाऱ्या झोपेवर रामबाण उपाय, जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुपारी जेवण केल्यानंतर बऱ्याचदा आळस, सुस्ती आणि झोप आल्यासारखे वाटते. यामुळे कामावर किंवा अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते. या समस्येला ‘फूड कोमा’ किंवा ‘पोस्टप्रांडियल सोम्नोलेन्स’ असेही म्हणतात. जेवणानंतरही दिवसभर ऊर्जावान आणि ॲक्टिव्ह राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही खास पदार्थांचा समावेश करू शकता. हे पदार्थ कोणते आहेत ते जाणून घ्या.

दही किंवा ताक
दुपारच्या जेवणात दही किंवा ताकाचा समावेश केल्यास पचनक्रिया सुधारते. यामध्ये असणारे प्रोबायोटिक्स आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवतात. तसेच दही खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि आळस दूर होतो.

हिरव्या पालेभाज्या
पालक, मेथी किंवा इतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह , फोलिक ॲसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. या भाज्या शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह चांगला ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे आळस येत नाही आणि दिवसभर उत्साह टिकून राहतो.

ड्रायफ्रूट्स आणि बिया
दुपारच्या जेवणानंतर हलकी भूक किंवा सुस्ती वाटल्यास बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया किंवा अळशी खाऊ शकता. यामध्ये निरोगी चरबी , प्रोटीन आणि फायबर असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात आणि ऊर्जा वाढवतात.

मोड आलेली कडधान्ये
मोड आलेल्या मुगात किंवा चण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असतात. दुपारच्या जेवणात सॅलड म्हणून किंवा हलका आहार म्हणून मोड आलेली कडधान्ये खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि शरीराला सतत ऊर्जा मिळत राहते.

ताजी फळे
जेवणानंतर काही वेळाने सफरचंद, संत्री, किंवा टरबूज यांसारखी ताजी फळे खाऊ शकता. फळांमधील नैसर्गिक साखर शरीराला झटपट ऊर्जा देते. तसेच यातील फायबरमुळे पचन हळूहळू होते आणि रक्तातील साखर अचानक वाढत नाही.

  • दुपारच्या वेळी खूप जास्त प्रमाणात किंवा जास्त तेलकट-तुपकट अन्न खाणे टाळा.
  • शरीरात पाण्याची कमतरता असल्यासही सुस्ती आणि आळस येतो. त्यामुळे दिवसभरात पुरेसे पाणी प्या.
  • जेवल्यानंतर लगेच बसून न राहता 5 ते 10 मिनिटे हलके चाला.