काचेचे ग्लास धूसर झाले आहेत? काही सोपे उपाय केल्यास पुन्हा दिसतील नवीन चमकदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काचेचे ग्लास वारंवार धुतल्यानंतर स्वच्छ आणि चमकदार दिसत नसतील, तर त्यामागे केवळ धूळ किंवा त्यावर लागलेली  कारणीभूत नसते. अनेकदा हार्ड वॉटरमधील कॅल्शियम आणि इतर खनिजांचे थर काचेवर साचल्यामुळे पांढरा किंवा धूसर थर तयार होतो.

तज्ज्ञांच्या मते, डिशवॉशरचा वारंवार वापर, जास्त तापमान आणि तीव्र डिटर्जंटमुळेही काचेची चमक कमी होऊ शकते. काही वेळा काचेवर कायमस्वरूपी ओरखडे किंवा ‘एचिंग’ झाल्यास ती पूर्ववत चमकवणे शक्य नसते.

जर धूसरपणा केवळ खनिजांच्या थरामुळे असेल, तर पांढरा व्हिनेगर हा प्रभावी घरगुती उपाय ठरू शकतो. एका भांड्यात पुरेसा व्हिनेगर घेऊन त्यात ग्लास पाच मिनिटे भिजवून ठेवावेत. व्हिनेगरमधील नैसर्गिक आम्लामुळे खनिजांचे थर विरघळण्यास मदत होते. जुने डाग असल्यास कोमट व्हिनेगर वापरल्यास अधिक चांगला परिणाम मिळू शकतो.

यानंतर ग्लास स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. काही डाग शिल्लक राहिल्यास थोडा बेकिंग सोडा लावून हलक्या हाताने घासावे. मात्र जास्त जोर लावल्यास काचेवर ओरखडे पडू शकतात.

ग्लास धुतल्यानंतर ते तसेच वाळू न देता मायक्रोफायबर किंवा मऊ, रेशारहित कापडाने लगेच पुसल्यास पाण्याचे डाग पडत नाहीत आणि काचेची चमक अधिक काळ टिकून राहते.

हार्ड वॉटरची समस्या असलेल्या घरांमध्ये महागडे किंवा नाजूक काचेचे ग्लास डिशवॉशरमध्ये धुण्याऐवजी हाताने स्वच्छ करणे अधिक योग्य ठरते. तसेच डिशवॉशरमध्ये आवश्यक तेवढेच डिटर्जंट वापरावे आणि धुण्याची प्रक्रिया पूर्ण होताच ग्लास बाहेर काढून लगेच कोरडे करावेत. या साध्या उपायांनी काचेची भांडी दीर्घकाळ नवीसारखी चमकदार राहू शकतात.