घरातील भिंतीवर वारंवार दिसणाऱ्या पालीला घालवण्यासाठी कोणते उपाय कराल?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

घरात भिंतीवर किंवा स्वयंपाकघरात वारंवार पाल दिसत असेल, तर त्यामागे केवळ पावसाळा किंवा उष्ण हवामान कारणीभूत नसते. पाल अशा ठिकाणी राहणे पसंत करते, जिथे तिला सहज अन्न, पाणी आणि लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळते. तज्ज्ञांच्या मते, डास, माश्या, मुंग्या, कोळी, पतंग आणि इतर लहान कीटक हे पालांचे प्रमुख खाद्य असते. त्यामुळे घरात या कीटकांची संख्या वाढली की पालही आपोआप येऊ लागते. विशेषतः रात्री तेजस्वी दिव्यांमुळे कीटक जमा होतात आणि त्यामुळे पालांची वर्दळ वाढते.

 

स्वयंपाकघरातील उघडे अन्न, कापलेली फळे किंवा पाण्याची गळती यामुळेही पालींना आकर्षण वाटते. सिंकजवळील ओलावा, गळणारे नळ किंवा बाथरूममधील साचलेले पाणी हे पालींसाठी अनुकूल वातावरण तयार करते.

 

पालींचा त्रास टाळण्यासाठी सर्वप्रथम घरातील कीटक कमी करणे आवश्यक आहे. नियमित स्वच्छता ठेवावी, कचरा साचू देऊ नये आणि भिंती, खिडक्या किंवा दरवाज्यांमधील भेगा बंद कराव्यात. स्टोअररूम, फर्निचरमागील जागा आणि स्वयंपाकघरातील कपाटांचीही वेळोवेळी स्वच्छता करावी.

 

काही घरगुती उपायही उपयुक्त ठरू शकतात. लसूण, काळी मिरी, मिरची पावडर किंवा अंड्याची टरफले काही प्रमाणात पालांना दूर ठेवण्यास मदत करतात, असे मानले जाते. मात्र नेफ्थलीनच्या गोळ्यांसारख्या पदार्थांचा वापर करताना लहान मुले आणि पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी.

 

हे सर्व उपाय करूनही घरात पालींची संख्या वाढत असेल, तर घरात कीटकांचा प्रादुर्भाव किंवा इतर समस्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी कीटकनियंत्रण तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.