
हिंदुस्थानच्या महिला नेमबाज इशा सिंग आणि मनू भाकर यांनी चीनमधील हांगझू येथे सुरू असलेल्या ISSF World Cup मध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात इशा सिंगने सूवर्ण पदक पटकावले, तर मनू भाकरने कांस्य पदकावर मोहोर उमटवली. अंतिम फेरीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत इशा सिंगने 40 लक्ष्यांसह दणक्यात सुवर्ण पदक पटकावले तर मनूने 28 लक्ष्यांसह कांस्य पदक पटकावले.
या स्पर्धेच्या पात्रता फेरीतही हिंदुस्थानी खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. मनू 586 गुणांसह अव्वल स्थानी राहिली, तर इशा सिंग 585 गुणांसह दुसऱ्या स्थानी होती. याशिवाय राही सरनोबत हिनेही 582 गुणांचे योगदान दिले, तर सिमरणप्रित कौर ब्रार आणि अभिज्ञा अशोक पाटील यांनी केवळ रँकिंग गुणांसाठी (RPO) सहभाग घेतला होता. म्युनिकमधील विक्रमी कामगिरीनंतर हांगझूमध्ये अपेक्षेचे ओझे होते, मात्र त्यावर मात केल्याचा आनंद असल्याचे इशाने सांगितले. तसेच, आशियाई क्रीडा स्पर्धेतील अनुभवाचा फायदा झाल्याचे तिने नमूद केले. आगामी स्पर्धांच्या तयारीसाठी हे पदक महत्त्वपूर्ण असल्याचे मनू भाकर हिने स्पष्ट केले. या दुहेरी पदकामुळे आंतरराष्ट्रीय नेमबाजीत हिंदुस्थानचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.
Double Delight for Team India! 🇮🇳🎯🥇🥉
Heartiest congratulations to Esha Singh on clinching the Gold Medal and Manu Bhaker on securing the Bronze Medal in the 25m Pistol event at the ISSF World Cup 2026. Their outstanding achievement is a testament to India’s growing… pic.twitter.com/6DySBIPkjQ
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 27, 2026


























































