
चिपळूण आंबेडकर चौक येथील कराड – गुहागर हायवेवर एस.एम.एस. बॅटरी दुकानासमोर एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव आणि निष्काळजीपणे चालवलेल्या दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी 25 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. मयत भास्कर पुंजाजी कोळी हे हायवेवरून जात असताना, आरोपी मंथन मिलिंद कुंभार (17) याने आपल्या ताब्यातील मोटारसायकल बेदरकारपणे चालवून त्यांना जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत भास्कर कोळी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या अपघातात दुचाकी चालकही जखमी झाला असून वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी रघुनाथ राजाराम सुर्वे (32) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात 26 जुलै रोजी पहाटे 3.25 वाजता आरोपी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

























































