
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे परिसरात झालेल्या भीषण अपघातानंतर रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते केतन पवार आणि ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी तातडीने सावर्ड्यात दाखल झाले. आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली.
डेरवण मुख्य रस्त्यांवर वारंवार होणारे अपघात, पावसामुळे निर्माण झालेले खड्डे आणि पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने वाहनचालकांसह नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर जागतिक दर्जाचे वालावलकर रुग्णालय, मेडिकल कॉलेज, इंग्लिश मीडियम स्कूल तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने रुग्णवाहिका, रुग्ण, कर्मचारी आणि नर्सरीपासूनच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
ग्रामस्थांच्या मागणीनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी महामार्गावर आवश्यक ठिकाणी रंबलर बसविणे, डेरवण मुख्य रस्त्यावर गतिरोधक उभारणे तसेच रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान पंचायत समिती सदस्य शौकत माखजनकर, शरद शिगवण, उद्योजक केतन पवार, सांस्कृतिक जिल्हाध्यक्ष देवराज गरगटे,सतीश जाधव, संतोष कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी झाली नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.


























































