सरकारने दिलेले आश्वासन पाळावे; विद्यार्थ्यांवर FIR दाखल होत असल्यावर CJP प्रवक्ते सौरव दास यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनानंतर दिल्लीसह भाजपशासित अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केले जात असल्याचा आरोप कॉकरोच जनता पक्षाने (सीजेपी) केला आहे. पक्षाचे प्रवक्ते सौरव दास म्हणाले की, केंद्र सरकारने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना एफआयआर मागे घेण्याचे आणि भविष्यात कोणतीही प्रतिशोधात्मक कारवाई न करण्याचे आश्वासन दिले आहे. आता सरकारने त्यांचे आश्वासन पाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

CJP चे प्रवक्ते सौरभ दास यांनी दिल्ली आणि भाजपशासित इतर राज्यांमधील विद्यार्थ्यांना पोलीस धमकावत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, आमच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी सरकारच्या वतीने आम्हाला आश्वासन दिले की, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध कोणताही एफआयआर दाखल केला जाणार नाही, असलेले एफआयआर मागे घेतले जातील आणि भविष्यात सूडबुद्धीने त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. सरकारने हे लेखी स्वरूपात द्यावे, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी उद्या अंतिम मुदत आहे.”

अनेक राज्यांमधून आम्हाला असे ऐकायला मिळत आहे की, मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. मुलांना ताब्यात घेतले जात आहे आणि मोठ्या संख्येने एफआयआर दाखल केले जात आहेत. आम्हाला कळवण्यात आले आहे की, बिहारमध्ये ५०० एफआयआर दाखल करण्यात आले आहेत आणि अत्यंत कठोर कलमे लावण्यात आली आहेत. सरकारने आम्हांला दिलेले आश्वासन पूर्ण करावे. त्यांनी या देशातील तरुणांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. आमच्या अटींमध्ये ही अट होती की, हे केवळ दिल्लीलाच नव्हे, तर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची शासन असलेल्या राज्यांनाही लागू व्हावे. आम्ही केंद्र सरकारकडून त्या पत्राची वाट पाहत आहोत आणि ते उद्यापर्यंत मिळेल अशी आशा आहे, असे ते म्हणाले.

सरकारने आम्हाला दिलेल्या हमींची अंमलबजावणी करण्यावर लक्ष केंद्रित करावे, सेन्सॉरशिप कशी लादायची किंवा मुलांना एफआयआरमध्ये कसे गोवायचे यावर नाही. सरकारने आम्हाला दिलेली हमी केवळ CJP साठी नाही, तर देशभरात रस्त्यावर उतरलेल्या लाखो तरुणांसाठीही आहे. जर तुम्ही त्यांची अंमलबजावणी केली नाही, तर तरुणांना पुन्हा रस्त्यावर उतरायचे की नाही याचा पुनर्विचार करावा लागेल. मुलांनी सध्या जंतर मंतर सोडले असले तरी, त्यांना परत यायला फार वेळ लागणार नाही. देशातील तरुण जागरूक झाले आहेत आणि त्यांच्यात खूप एकता आहे, असा इशाराही त्यांनी दिला.