महाराष्ट्रात अतिमुसळधार, हवामान खात्याकडून 22 जिह्यांना अलर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात पाऊस परतला असताना पुढील काही दिवस मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून 22 जिह्यांना पावसाचा ‘अलर्ट’ देण्यात आला आहे. यामध्ये मुंबईला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

उत्तर-पश्चिम बंगालच्या खाडीत आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून जोरदार पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. यामुळे मुंबईसह कोकण विभागात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर रायगड आणि रत्नागिरी जिह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.  तर उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदूरबार आणि नाशिक जिह्यांत मध्यम पाऊस अपेक्षित असून  जळगाव जिह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी  30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहणार आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

  • पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिह्यात हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर पुणे, सातारा घाटमाथा परिसरासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.
  • तर कोल्हापूरसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
  • तर मराठवाडय़ात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिह्यांमध्ये 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
  • विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ आहे.