
जुन्या प्रेमसंबंधातून विवाहित प्रेमी युगुलाने विषारी औषध प्राशन करून जीवन संपवले. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील मानोली शिवारात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
गणेश नामदेव ढोले आणि अंजली जोगेंद्र मीना अशी आत्महत्या केलेल्या जोडप्याची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार, दहा वर्षांपूर्वी गणेश आणि अंजली यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यानंतर अंजली कामानिमित्त राजस्थानला गेली. तेथे तिच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह लावून दिला. तिला दोन मुले असून गणेश याचाही दरम्यान विवाह झाला होता.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांचा पुन्हा संपर्क झाला. त्यानंतर अंजली दोन दिवसांपूर्वी मानोली येथे आली होती. याच काळात दोघांनी मानोली शिवारात विषारी औषध प्राशन केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमागे नेमके कारण काय, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच घाटंजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून, अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





























































