उजनी धरण १०० टक्के भरले, भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरण आजअखेर १०० टक्के भरले आहे. आज, दि. २७ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उजनी धरणाच्या १६ दरवाजांतून १० हजार क्युसेक वेगाने भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून, विद्युत निर्मिती प्रकल्पातून १,६०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. यात हळूहळू वाढ करत सायंकाळी ७ वाजता विसर्ग ३० हजार क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला असून, पुढेही त्यात वाढ करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे उजनीत पाणीसाठा वेगाने वाढत आहे. उजनी धरणात दौंड येथून येणाऱ्या विसर्गात मध्येच घट झाली होती, मात्र त्यात पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ होऊन आज सायंकाळी तो ६५,०८४ क्युसेकवर पोहोचला आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात पुन्हा अधिक पाऊस झाल्यामुळे दौंडवरून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. परिणामी, उजनीतून भीमा नदीत सकाळी ११ वाजता सुरू केलेला ६,६०० क्युसेकचा विसर्ग दुपारी २ वाजता वाढवून ११,६०० क्युसेक करण्यात आला. या विसर्गात आवश्यकतेनुसार आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

‘नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि पात्रात कोणतीही तत्सम साधने अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ हलवण्यात यावीत. सखल भागातील संबंधित नागरिकांना पूर्वसूचना देण्यात यावी आणि सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी,’ असे आवाहन उजनी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यासह उजनी धरण पाणलोट क्षेत्रात जून-जुलैमध्ये सरासरीच्या निम्मासुद्धा पाऊस झालेला नाही. विशेषतः उजनी धरण क्षेत्रात एकही मोठा पाऊस झाला नाही. दोन महिन्यांत केवळ १५५ मि.मी. पाऊस होऊनही, उन्हाळ्यात उणे २८.११ टक्क्यांपर्यंत पोहोचलेले उजनी धरण सध्या १०० टक्क्यांकडे वाटचाल करत आहे. केवळ पुणे जिल्ह्यातील पावसामुळेच उजनी धरण भरत आहे.

गेल्या २८ दिवसांत उजनी धरणात १२८% पाणी आले आहे. ४ जुलै रोजी उजनी उणे २८.११% होते. अवघ्या चार दिवसांत, ८ जुलै रोजी ते उणेमधून धन पातळीवर आले आणि ८ जुलैपासून आज २७ तारखेपर्यंत, म्हणजे केवळ २० दिवसांत धरणात जवळपास १००% पाणीसाठा झाला आहे. सध्या उजनी धरणात ११४.५३ टीएमसी एकूण पाणीसाठा असून, त्यातील ५०.८२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. उजनी १००% भरण्यासाठी आणखी ३ ते ४% पाण्याची गरज आहे. परंतु, वरून येणारा विसर्ग जास्त असल्यामुळे धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. उजनीच्या वरील १९ धरणांपैकी केवळ एकाच धरणाचा पाणीसाठा अल्प आहे. उर्वरित सर्व धरणे १००% च्या जवळ आली आहेत. त्यामुळे थोडा जरी पाऊस पडला, तरी ते अतिरिक्त पाणी उजनी धरणातच येणार आहे. या विसर्गामुळे उजनी १०० ते १११% पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्हा व परिसरातील घाटमाथा, तसेच भीमा खोऱ्यात सातत्याने होत असलेल्या पावसामुळेच हे शक्य होत असल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे सध्या भरण्याच्या स्थितीत असल्याने या धरणांतील अतिरिक्त पाणी उजनी जलाशयात येत आहे. पुणे जिल्ह्यातील १२ ते १५ धरणे १००% क्षमतेने भरली आहेत, तर वीर, गुंजवणी, आंध्रा आणि कळमोडी ही धरणे भरण्याच्या स्थितीत आली आहेत.

२७ जुलै रोजी उजनी धरणाची सायंकाळची पाणीपातळी पुढीलप्रमाणे:

  • एकूण पाणीपातळी: ४९६.७३० मीटर

  • एकूण पाणीसाठा: ३,२८६.५४ दलघमी (११६.०५ टीएमसी)

  • उपयुक्त पाणीसाठा: १,४८३.७३ दलघमी (५२.८१ टीएमसी)

  • टक्केवारी: ९७.७९%

उजनीत येणारा विसर्ग:

  • दौंड: ६५,०८४ क्युसेक

  • बंडगार्डन: १८,३२१ क्युसेक

उजनीतून खाली सोडण्यात येणारा विसर्ग:

  • भीमा नदी: २०,००० क्युसेक

  • बोगदा: ९०० क्युसेक

  • कालवा: २,४०० क्युसेक

  • दहिगाव उपसा सिंचन: ९० क्युसेक

  • सीना माढा उपसा सिंचन: २८० क्युसेक

  • वीज निर्मिती: १,६०० क्युसेक