एके-४७ आणि पेलेट गनचा वापर… तरुण ही दृश्ये कधीच विसरणार नाहीत; विद्यार्थ्यांवरील कारवाईवरून मनोज झा यांचा भाजपवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून झालेल्या कारवाईवरून राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि खासदार मनोज झा यांनी सोमवारी केंद्रातील आणि बिहारमधील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आंदोलक विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला एके-४७ आणि पेलेट गनचा वापर अत्यंत निंदनीय असून, देशातील तरुण या कारवाईची दृश्ये कधीही विसरणार नाहीत, असा इशारा मनोज झा यांनी दिला आहे. तसेच भविष्यात शांततापूर्ण निदर्शनांविरुद्ध अशा प्रकारच्या कोणत्याही हिंसेला लोकशाहीत स्थान नाही, असेही ते म्हणाले. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मनोज झा यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर आणि हेतूवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोकसभेत मंगळवारी मांडण्यात आलेल्या सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयकाच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, कायदे अधिक कडक करण्याचे प्रयत्न सरकार करू शकते, परंतु पूर्वी कायदे नव्हते म्हणून पेपरफुटीच्या घटना घडल्या, असे अजिबात नाही. याआधीही नियम होते, परंतु या प्रकरणांमध्ये मोठ्या आणि प्रभावशाली लोकांचा सहभाग असल्याने अशा घटना सातत्याने घडत आहेत. सरकारची धोरणे ही त्यांच्या हेतूवरून ठरत असतात, असेही ते म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी अयोध्येतील देणगी घोटाळ्याचे उदाहरण देत व्यवस्थेवर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, “अयोध्येतील देणगी घोटाळ्याकडे पाहा, त्यासाठी कायदे नाहीत का? पण जेव्हा जबाबदारी सोपवलेले लोकच स्वतः घोटाळ्यात सामील असतात, तेव्हा काय होणार? जर नंदन नीलेकणी या मुद्द्यांवर खरोखरच प्रामाणिकपणे काम करणार असतील, तर त्यांचे स्वागतच आहे, पण शेवटी धोरणे ही तुमच्या हेतूवरच अवलंबून असतात.”