ठाण्यात विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमात शिंदेंनी भाजपला डावलले, उपमहापौरांचा संताप; पुन्हा उद्घाटन करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विविध विकासकामांचे उद्घाटन रविवारी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. हा लोकार्पण कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेचा असूनही या उद्घाटनाला शहरातील भाजपचे आमदार, नगरसेवक यांना डावलल्याने उपमहापौर कृष्णा पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. जाणूनबुजून भाजपच्या नेत्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले असून या सर्व विकासकामांचे पुन्हा उद्घाटन करावे, अशी मागणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सात विविध प्रकल्पांचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. त्यात अमृत योजनेतील प्रकल्प व पुलाचाही समावेश आहे. मात्र या कार्यक्रमाची कोणतीही पूर्वकल्पना आपणास देण्यात आली नाही. ही सर्व माहिती फेसबुकद्वारे समजली असल्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. केंद्र व राज्य सरकार तसेच महानगरपालिकेची ही विविध विकासकामे होती. त्याचा शुभारंभ संयुक्तपणे करणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात भाजपचे आमदार आणि नगरसेवक यांना विचारलेही नाही. एवढेच नव्हे तर उपमहापौर या नात्यानेदेखील कार्यक्रमांना बोलावले नसल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

केळकर, डावखरे यांना बोलवा

एकनाथ शिंदे यांनी ज्या सातही प्रकल्पांचे उद्घाटन केले त्याचे पुन्हा एकदा लोकार्पण करावे आणि त्यासाठी आमदार संजय केळकर व निरंजन डावखरे यांना बोलवावे, अशी मागणी भाजपच्या उपमहापौरांनी आयुक्तांकडे केली आहे. याचे तीव्र पडसाद उद्या होणाऱ्या महापालिकेच्या महासभेत उमटण्याची शक्यता आहे.