
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला असताना, गेल्या सलग तीन रात्री अमेरिकेने इराणवर कोणताही नवा लष्करी हल्ला केलेला नाही. मात्र याचा अर्थ तणाव निवळला असा होत नसून लष्करी कारवाईचा पर्याय अजूनही पूर्णपणे खुला आहे, असे अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे.
फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिका सध्या थेट लष्करी हल्ल्यांऐवजी कूटनीतिक चर्चा, आर्थिक निर्बंध वाढवणे आणि सागरी नाकेबंदी यांसारख्या पर्यायांवर विचार करत आहे. अमेरिकेने लागू केलेल्या या सागरी नाकेबंदीमुळे इराणचे दररोज कोट्यवधी डॉलरचे नुकसान होत असून त्यांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे.
दुसरीकडे इस्रायलही पूर्णपणे सतर्क असून पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. जर इस्रायलवर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला, तर त्याला अत्यंत कठोर आणि चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे नेतन्याहू यांनी म्हटले आहे. या सर्व घडामोडीं दरम्यान युक्रेनने कॅस्पियन समुद्रात इराणी लष्करी साहित्य वाहून नेणाऱ्या जहाजांना लक्ष्य केल्याचा नवा दावा केला आहे. या दाव्यामुळे रशिया आणि इराणमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून प्रादेशिक तणावात आणखी भर पडली आहे.
सध्या अमेरिका, इराण, इस्रायल आणि त्यांचे सहयोगी देश यांच्यातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. जरी सध्या मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाया थांबल्या असल्या, तरीही कोणत्याही क्षणी एखादी नवीन घटना घडल्यास परिस्थिती वेगाने बदलू शकते. त्यामुळे मध्यपूर्वेतील या नाजूक स्थितीकडे आणि पुढील घडामोडींकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.




























































