आजचे तरुण मोदी सरकारच्या धमक्यांना घाबरत नाहीत, ते सरकारला प्रश्न विचारत आहेत – मल्लिकार्जुन खरगे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “आजचा तरुण मोदी सरकारच्या धमक्यांना घाबरत नाही, तो आता थेट प्रश्न विचारत आहे,” असे म्हणत खरगे यांनी सरकारला धारेवर धरले. तसेच, निदर्शकांवर झालेल्या पोलीस कारवाईबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टीकरण द्यावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही खरगे यांनी केली आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

X वर केलेल्या पोस्टमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी आरोप केला आहे की, नीट-यूजी पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणांना धमक्या दिल्या जात आहेत. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये अनेक तरुणांना बळजबरीने ताब्यात घेण्यात आले आहे.

मल्लिकार्जुन खरगे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, “आधी या तरुणांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि पॅलेट गनचा वापर करण्यात आला. आता आंदोलने संपल्यानंतर त्यांच्या सोशल मीडिया खात्यांची तपासणी केली जात आहे. हे एका घाबरलेल्या हुकूमशहाचे लक्षण आहे.”

मल्लिकार्जुन खरगे यांनी तरुणांच्या वतीने सरकारला तीन मोठे प्रश्न विचारले आहेत…

१. शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी आणि पेपरफुटी रोखण्यासाठी ७६६ दिवसांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या डॉ. राधाकृष्णन समितीच्या शिफारशींचे नक्की काय झाले?
२. ८९५ दिवसांपूर्वी पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा मंजूर करण्यात आला होता, मग त्यानंतरही इतक्या मोठ्या प्रमाणावर पेपरफुटी कशी झाली?
३. गेल्या ६४७ दिवसांपासून NTA (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) ला पूर्णवेळ संचालक का नियुक्त करण्यात आलेला नाही?