गौतम गंभीरची साथ सोडली; टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकाने दिला राजीनामा, कारण काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा एखाद्या वाईट स्वप्नासारखा होता. टी20 आणि वनडे मालिकेत संघाची कामगिरी अत्यंत खराब राहिली. त्यामुळे दोन्ही मालिकांमध्ये संघाचा पराभव झाला. त्यामुळे संघ आणि प्रशिक्षकांवर बरीच टीका सुद्धा झाली होती. दरम्यान, आता टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रयान टेन डोशेट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. ईएसपीएनक्रिकइंफो’च्या रिपोर्टनुसार, इंग्लंड दौऱ्यातील टी-20 मालिकेनंतर त्यांनी यूकेमध्येच बीसीसीआयला आपल्या निर्णयाची माहिती दिली होती.

यूके दौऱ्यातील टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला असून, आगामी IPL 2027 मध्ये ते पुन्हा एकदा कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघासोबत जोडले जाणार आहेत. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर नेदरलँड्सचे माजी कर्णधार रयान टेन डोशेट यांची टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या या कालावधीत टीम इंडियाने 2025 चा आशिया कप आणि 2026 चा टी-20 विश्वचषक जिंकला. मात्र, यादरम्यान ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावण्यासह न्यूझीलंड (0-3) आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (0-2) घरच्या मैदानावर झालेल्या मालिकेत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

रयान टेन डोशेट यांचे केकेआर फ्रँचायझीशी जुने नाते आहे. खेळाडू म्हणून त्यांनी केकेआरसाठी 2012 आणि 2014 चे जेतेपद जिंकले होते. त्यानंतर 2022 मध्ये ते केकेआरचे फिल्डिंग कोच बनले आणि 2024 पर्यंत कोचिंग स्टाफचा भाग राहिले. त्यानंतर त्यांनी हिंदुस्थान संघाची जबाबदारी स्वीकारली होती, मात्र आता ते पुन्हा एकदा केकेआर संघात परतणार आहेत.