
शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील जैन मठातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लाडक्या ‘माधुरी’ हत्तीला गुजरातमधील ‘वनतारा’ येथे नेऊन आज एक वर्ष पूर्ण झाले. सर्वोच्च न्यायालय, हाय पॉवर कमिटी आणि वनतारा प्रशासनाने माधुरी हत्तीला नांदणी मठाकडे परत करण्याचा निर्णय देऊनही प्रशासकीय दिरंगाईमुळे होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ आणि ‘माधुरी’च्या तातडीने घरवापसीसाठी आज नांदणी येथे ‘एकदिवसीय उपवास जनसंकल्प’ करण्यात आला.
माधुरी हत्तीणीच्या आगमनाला होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून नांदणी निशिधीका येथे माता चक्रेश्वरी देवीची महाआरती करून जनसंकल्पाची सुरुवात करण्यात आली.सायंकाळी उशिरापर्यंत हे उपोषण सुरू होते. वनतारा प्रशासनाकडून नांदणी येथे हत्तीच्या देखभालीसाठी सर्व अद्ययावत सोयीसुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. आवश्यक त्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असतानाही केवळ तज्ञ समितीच्या अंतिम अहवालाअभावी माधुरी हत्तीण येण्यास विलंब लागत आहे. जैन समाज आणि स्थानिक जनतेच्या भावनांशी हा खेळ सुरू असल्याचा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी माजी मंत्री महादेव जानकर, प्रतीक पाटील, माजी आमदार राजीव आवळे, उद्यानपंडित गणपत पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक आणि भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.
येत्या 13 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार
येत्या दि. 13 सप्टेंबर रोजी नांदणी येथे प्रथमाचार्य शांतीसागर महाराज यांच्या 100व्या चातुर्मास निमित्ताने 71 वी पुण्यतिथी साजरी होणार आहे. यासाठी सांगली, कोल्हापूर आणि उत्तर कर्नाटकातून जवळपास 3 लाख भाविक उपस्थित राहणार आहेत. 1300 वर्षांचा प्राचीन इतिहास असलेल्या या मठाच्या धार्मिक परंपरेत 400 वर्षांपासून हत्तीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या सोहळ्यापूर्वी माधुरी हत्ती मठात दाखल व्हावी, अशी तीव्र मागणी आता जोर धरू लागली असून, प्रशासनाने त्वरित पावले न उचलल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा भाविकांनी दिला आहे. तर 13 सप्टेंबरपर्यंत माधुरी हत्तीण परत न दिल्यास नांदणी येथील शांतीसागर महाराज यांच्या पुण्यतिथी दिवशी मुंबई येथील मोर्चाची घोषणा करण्यास मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासस्थानी जावून जाब विचारणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी दिला. तसेच स्वातंत्र्यदिनाच्या पुर्व संध्येला प्रत्येक गावात ग्रामपंचायतसमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही सांगितले.





























































