सातारा जिल्ह्यातील धरणांत 74 टक्के पाणीसाठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिल्ह्यातील कोयना, कण्हेर, धोम, धोम बलकवडी, उरमोडी व तारळी धरणांत 74 टक्के पाणीसाठा झाला आहे. धोम बलकवडी व कण्हेर धरणांतून विसर्ग सोडण्यात आल्याने वेण्णा व कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली तालुक्याच्या पश्चिम भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. धरणे भरण्यासाठी अजून मोठय़ा पावसाची आवश्यकता आहे. कोयना धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 72.80 टीएमसी असून, धरण 77.92 टक्के भरले आहे. धरणात 22 हजार 530 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धोम धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 8.780 टीएमसी असून, धरण 75.11 टक्के भरले आहे. धरणात 4 हजार 138 क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

धोम बलकवडी धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 3.420 टीएमसी असून, धरण 86.36 टक्के भरले आहे. धरणात 1 हजार 544 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर धरणाच्या सांडव्यातून 1 हजार 469 क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. कण्हेर धरणात उपयुक्त पाणीसाठा 8.820 टीएमसी असून, धरण 91.97 टक्के भरले आहे. धरणात 3 हजार 683 क्युसेक पाण्याची आवक होत आहे, तर धरणाच्या सांडव्यातून 4 हजार 409 क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. उरमोडी धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 7.890 टीएमसी असून, धरण 81.76 टक्के भरले आहे. धरणात 3 हजार 533 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तारळी धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 4.390 टीएमसी असून, धरण 75. 17टक्के भरले आहे. धरणात 2 हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

मध्यम प्रकल्प असलेल्या येरळवाडी 30.69 टक्के, नेर 62.50 टक्के, राणंद 10.18 टक्के, आंधळी 54.96 टक्के, नागेवाडी 66.35 टक्के, मोरणा 65.46 टक्के, उत्तरमांड 70.58 टक्के, महू 80.55 टक्के, हातगेघर 47.60 टक्के, वांग मराठवाडी 72.65 टक्के पाणी साठा आहे. धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

कोयना जलाशयातील तराफा सेवा पुन्हा सुरू

कोयनेच्या शिवसागर जलाशयातील पाण्याने तळ गाठल्यानंतर मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली तापोळा येथील तराफा सेवा सोमवार (दि.27) पासून पुन्हा सुरू झाली आहे. 105 गावांतील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्यासाठी जि.प. सदस्य अजित सपकाळ, महाबळेश्वर पंचायतचे उपसभापती संजयराव मोरे यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे दरवर्षी 15 ऑगस्टला सुरू होणारी तराफा सेवा यंदा लवकर सुरू झाली आहे. कोयनेच्या शिवसागर जलाशयातून वाहनांची वाहतूक करण्यासाठी तापोळा या ठिकाणी जिल्हा परिषदेमार्फत तराफा सेवा सुरू आहे. हा तराफा केळघर तर्फ सोळशी, तापोळा व गाढवलीदरम्यान वाहनांची जलाशयातून वाहतूक करत असतो. कांदाटी, तापोळा, दरे भागांतील दळणवळण व्यवस्थेचा कणा असलेली तराफा सेवा सुरू झाल्याने स्थानिकांसह पर्यटकांना सोयीचे होणार आहे. यावेळी विशाल सपकाळ, आनंद धनावडे, सचिन कदम, प्रमोद कदम, गणेश भोसले, संतोष पवार, गणेश उतेकर, मंगेश माने आदी उपस्थित होते.