CWG 2026 – गोळाफेकीत हिंदुस्थानचा दुहेरी धमाका, शर्मिलाला सुवर्ण; शायलाला कांस्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दारिद्र, अपंगत्व, संसारातील वादळे आणि समाजाच्या टोमण्यांना सामोरे जात हिंदुस्थानच्या शर्मिला धनखडने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या पॅरा शॉटपूट (गोळाफेक) एफ-57 प्रकारात सुवर्णपदक जिंकत तिरंगा दिमाखात फडकवला. 9.81 मीटरच्या हंगामातील सर्वोत्तम फेकीसह तिने हिंदुस्थानला स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. याच प्रकारात हिंदुस्थानच्या शिल्पा के. शायलाने कांस्यपदक पटकावले.

घर विकलेपण स्वप्न साकारले!

महेंद्रगड जिह्यातील चित्रौली गावातील शर्मिलाचे आयुष्य म्हणजे संघर्षाचा ज्वालामुखीच! दोन वर्षांची असताना पोलिओमुळे एक पाय निकामी झाला. वडील अल्पभूधारक शेतकरी, आई दृष्टिहीन, उपचारासाठी पैसा नव्हता. आर्थिक विवंचनेत लहान वयात विवाह झाला. संसार कोलमडला. दोन मुलींना घेऊन माहेरी परतावे लागले. दुसऱ्या विवाहानंतर पती अजित यांनी तिच्यातील खेळाडू ओळखला. 34 व्या वर्षी कोच टेकचंद आणि देवेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरा शॉटपूटचा प्रवास सुरू झाला, पण सरावासाठी पैशांची चणचण इतकी की 2023मध्ये स्वतःचे घर विकून प्रशिक्षणाचा खर्च उचलावा लागला! घर गेले, पण जिद्द ढळली नाही. आणि त्याच जिद्दीने आज सोनेरी इतिहास घडवला.

सर्वेशची ऐतिहासिक रुपेरी झेप

पुरुषांच्या उंच उडीत महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने 2.25 मीटर उडी मारून रौप्यपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेतील उंच उडीत पदक जिंकणारा तो पहिलाच हिंदुस्थानी ठरला, हे विशेष. काही दिवसांपूर्वी डायमंड लीगमध्येही त्याने कांस्यपदक जिंकत हिंदुस्थानी अॅथलेटिक्सला नवी ओळख मिळवून दिली होती.

अजयचे एका किलोने सुवर्ण हुकले

राष्ट्रकुल स्पर्धेतील वेटलिफ्टिंगमध्ये 79 किलो वजनी गटात अजय बाबू वल्लुरीने एकूण 330 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. मलेशियाच्या एरी हिदायतने 331 किलो वजन उचलत अवघ्या एका किलोच्या फरकाने अजयकडून सुवर्णपदक हिसकावले. स्नॅचमध्ये अजयने स्पर्धा विक्रम नोंदवला. मात्र क्लीन अॅण्ड जर्कच्या अखेरच्या प्रयत्नात मलेशियन खेळाडूने बाजी पलटवल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

शिल्पाला न्याय मिळालाचौथ्या स्थानावरून थेट कांस्य!

शिल्पा शायला हिने 7.26 मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम फेक केली होती. सुरुवातीला तिला चौथे स्थान देण्यात आले. मात्र हिंदुस्थानने नायजेरियाच्या खेळाडूच्या फेकीवर आक्षेप घेतल्यानंतर पंचांनी फेरतपासणी केली. संबंधित फेक फाऊल ठरल्याने सुधारित निकालात शिल्पाला थेट कांस्यपदक बहाल करण्यात आले. पदक मिळताच शिल्पाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.