‘अरे देवा!’ धो धो पाऊस, नागपूर बुडाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘देवाभाऊं’च्या नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने महापालिकेच्या पावसाच्या ‘तयारी’ आणि आपत्कालीन व्यवस्थेचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले आहेत. आज दुपारपासून झालेल्या पावसाचे पाणी सोमलवार हायस्कूल निकालस आणि खामला शाळेत घुसल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला. या मुलांना वेळीच रेस्क्यू केल्याने मोठा अनर्थ टळला.

नागपूरमध्ये दुपारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाल्यापासूनच पावसाळापूर्व कामांचा बोजवारा उडाल्याचे समोर आले. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली. सोमलवार शाळेसमोर रस्त्याचे बांधकाम सुरू असल्यामुळे रस्त्यावरचे सर्व पाणी शाळेत घुसल्याने घबराट निर्माण झाली. दरम्यान, गेल्या 20 वर्षांपासून पालिकेत सत्ताधारी असणाऱया भाजपच्या काळात वारंवार नागपूर तुंबण्याच्या घटना घडत आहेत. सत्ताधाऱयांचा नियोजनशून्य कारभार आणि सर्वत्र उंच सिमेंट रस्ते बांधल्यामुळे पाणी रस्त्याशेजारील भागात घुसत असल्याचा संताप रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.

आज शाळांना सुट्टी

नागपूरमध्ये दुपारपासून चार तासांत 108 मिमी पावसात नागपूर तुंबल्याने पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यातच उद्यादेखील नागपूरमध्ये अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याने इशारा दिला असल्याने उद्या, 29 जुलै रोजी शाळा-कॉलेज, कोचिंग क्लासेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

800 मुले सुदैवाने बचावली

सोमलवार निकालास आणि खामला या पहिली ते दहावीच्या दोन प्रमुख शाळांच्या परिसरात 3 ते 4 फूट पाणी अचानक घुसल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली. पाण्याचा वेग प्रचंड असल्याने विद्यार्थ्यांना उभे राहणेही कठीण झाले. यावेळी अग्निशमन दल, स्थानिक नागरिक आणि पालकांनी शाळेच्या इमारतीपासून मुख्य रस्त्यापर्यंत मानवी साखळी करून सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले.