राजापूर–रानतळे मार्गावर भीषण अपघात, दोन एसटी बसची समोरासमोर धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजापूर–रानतळे मार्गावर मंगळवारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसून दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर–चिपटेवाडी ही एसटी बस रानतळे मार्गे चिपटेवाडीकडे जात होती. त्याचवेळी भालावली–राजापूर ही एसटी बस राजापूरच्या दिशेने येत होती. भालावली–राजापूर बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली.या अपघातात दोन्ही बसच्या दर्शनी काचा, आरसे तसेच बंपरचे नुकसान झाले. मात्र बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच राजापूर आगाराच्या आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर आणि वाहतूक निरीक्षक स्वप्नील कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करून त्यांना पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.या अपघाताप्रकरणी पोलिसांकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.