CWG 2026 – महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने ग्लासगोमध्ये तिरंगा फडकावला, उंच उडीत रौप्य पदक जिंकणारा पहिलाच हिंदुस्थानी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या Commonwealth Games 2026 मध्ये सोमवारी, 27 जुलै 2026 महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारे याने ऐतिहासिक कामगिरी करत देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. पुरुषांच्या उंच उडीत त्याने रौप्य पदक पटकावत इतिहास रचला. उंच उडीमध्ये रौप्य पदक जिंकणारा तो हिंदुस्थानचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. सर्वेश कुशारेनच्या नेत्रदिपक कामगिरीमुळे नाशिक जिल्ह्यातील देवरगावात आनंदाच वातावरण आहे.

सर्वेशने कुशारेने 2.25 मीटर उंच उडी मारत रौप्य पदक पटकावले, तर जमैकाच्या रोमेन बेकफोर्डने सुवर्ण आणि इंग्लंडच्या जॅक किमानीने कांस्य पदक जिंकले. दोघांनी समान उंची पार केल्यावर काऊंटबॅक नियमानुसार बेकफोर्डला सुवर्ण पदक जाहीर झाले. नाशिक जिल्ह्यातील देवरगाव येथील सर्वेशचे बालपण अत्यंत संघर्षात गेले. त्याचे वडील शेतकरी असून त्यांनी योग्य साधनांच्या अभावी मक्याची टरफले, कापूस आणि शेतातील टाकाऊ वस्तू वापरून सराव करण्यासाठी मॅट तयार केली होती, ज्यावर सर्वेशने सुरुवातीला सराव केला. पुढे राज्यस्तरावर चमकदार कामगिरी केल्यावर त्याला सैन्यात स्पोर्ट्स कोटाअंतर्गत नोकरी मिळाली, ज्यामुळे त्याला उत्तम प्रशिक्षण आणि संसाधने उपलब्ध झाली.

सर्वेशने याआधीही अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याने राष्ट्रीय आंतर-राज्य अजिंक्यपद स्पर्धेत 2.31 मीटर उंच उडी मारत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. तसेच, डायमंड लीग स्पर्धेत पोडियम फिनिश करणारा तो पहिला हिंदुस्थानी खेळाडू ठरला असून, त्याने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य आणि दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक आपल्या नावावर केले आहे.