
जुलै महिना संपण्यास फक्त दोन दिवस उरलेले असले तरी रायगड जिल्ह्यातील भाताच्या लावणीने वेग पकडलेला नाही. जिल्ह्यात भाताचे पीक ७३ हजार २२६ हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. मात्र त्यापैकी फक्त नऊ हजार ५०५ हेक्टर क्षेत्रावर भाताची लावणी पूर्ण झाली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सूनचा पाऊस उशिराने सुरू झाल्याने त्याचा जोरदार फटका भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यातील सुमारे ६४ हजार हेक्टर क्षेत्र अद्याप लावणीच्या प्रतीक्षेत आहे.
दरवर्षी रायगड जिल्ह्यात भाताच्या लावणीला जुलै महिन्याच्या प्रारंभी सुरुवात होते. मृगाचा पाऊस पडल्यानंतर भाताची रोपे तयार करण्यासाठी शेतकरी पेरणी करतात. ही रोपे २० ते २५ दिवसांत लावणीसाठी तयार होतात. मात्र यंदा एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचा पाऊस उशिराने सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडले आहे. जून महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांत पावसाने पाठ फिरवली होती. मात्र जून महिन्याच्या शेवटी व जुलै महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. त्यांनतर थोडी विश्रांती घेतल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाची संततधार सुरू झाली आहे. सध्या भात पिकाच्या लावणीच्या कामांसाठी पोषक वातावरण तयार झाले असले तरी लावणी फक्त नऊ हजार ५०५ हेक्टर क्षेत्रावरच झालेली आहे.
२५ हजार हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट
२९ जून ते ६ जुलैदरम्यान रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. मुसळधार पावसामुळे शेतीत पाणी साचून राहिल्याने भात पिकाच्या रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करावी लागली आहे. सध्या रोपवाटिकांमध्ये भाताची रोपे तयार होत आहेत. त्यामुळे सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्रातील लावण्याची कामे खोळंबणार आहेत.
– खरीप हंगामासाठी एकूण १८ हजार २०० क्विंटल १६ हजार ९५० विविध प्रकारची बियाणे तर १४ हजार मेट्रिक टन खताची मात्रा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
– दरवर्षी १० ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील भाताची लावणी पूर्ण होते. मात्र यंदा पाऊस उशिराने सुरू झाल्याने जिल्ह्यात भात लावणीचे काम ऑगस्टच्या शेवटपर्यंत चालणार आहे.




























































