
हजारो ग्रामस्थ, मच्छीमारांचा विरोध असूनही वाढवण बंदरासह मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वे, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन यांसारखे प्रकल्प माथी मारले जात असतानाच आता कोरे विमानतळ व पेट्रोलियम प्रकल्पाची त्यात भर पडली आहे. मात्र या दोन्ही प्रकल्पांविरोधात पालघरवासीयांनी वज्रमूठ आवळली आहे. आशापुरा मातेचा आशीर्वाद घेऊन आंदोलनाचा बेल भंडारा उधळण्यात आला असून कोणत्याही परिस्थितीत कोरे विमानतळ व पेट्रोलियम प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
प्रस्तावित कोरे विमानतळ आणि पेट्रोलियम प्रकल्पामुळे हजारो एकर जमीन, किनारपट्टीचा पर्यावरणीय समतोल, जैवविविधता, खारफुटी, पारंपरिक शेती आणि मत्स्य व्यवसाय धोक्यात येणार आहे. या भागातील ग्रामस्थांचे जीवनमान आणि उपजीविकेची साधने उद्ध्वस्त होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. विकासाच्या नावाखाली स्थानिकांचे अस्तित्व धोक्यात घाल णारे कोणतेही प्रकल्प आम्हाला नकोत, असा निर्धार आशापुरा देवीच्या मंदिरात झालेल्या बैठकीत करण्यात आला. या प्रकल्पाविरोधात लढण्यासाठी आम्हाला बळ मिळू दे, असे साकडेदेखील मातेच्या चरणी घालण्यात आले.
तर संघर्ष तीव्र होईल
कोरे विमानतळ व पेट्रोलियम प्रकल्पाविरोधात रविवारी आंदोलनाचे पहिले पाऊल टाकण्यात आले. पुढील काही दिवसांत गावोगावी बैठका, जनजागृती मोहीम, ग्रामसभा आणि नागरिकांशी संवाद साधून व्यापक लोकआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा ग्रामस्थ स्वनील तरे यांनी दिला आहे. स्थानिकांच्या भावना आणि पर्यावरणाचा विचार न करता कोणताही प्रकल्प लादण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र लोकसंघर्ष उभारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पर्यावरण, जैवविविधता आणि स्थानिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी हा संघर्ष उभारला जात असून प्रशासनाने आणि सरकारने स्थानिकांच्या भावना समजून घेत प्रकल्पांबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.





























































