
तालुक्यातील सूर्यमाळ गावातील तीनही स्मशानभूमींची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. स्मशानभूमींवर शेडच नसल्याने भरपावसात उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
मोखाडा तालुक्यातील सूर्यमाळ गावात एकूण तीन स्मशानभूमी आहेत. मात्र यातील एकही स्मशानभूमी सुस्थितीत नाही. त्यावरील छपरे उडून गेलेली आहेत. त्यामुळे तळपत्या उन्हात मृतदेहांना अग्नी द्यावी लागते. भरपावसात मृतदेहांना वारंवार अग्नी द्यावी लागते. सूर्यमाळ येथील बारकु मोरे आणि पाथर्डी रामवाडी येथील कमळू बुधर यांचे निधन झाले. मात्र गावातील तीनही स्मशानभूमींची दुरवस्था झाल्यामुळे भरपावसात नातेवाईकांना हातात छत्री घेऊन मृतदेहांना अग्नी द्यावी लागते. त्यामुळे लवकरात लवकर स्मशानभूमींच्या छतांचे काम करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तीनही स्मशानभूमींवर शेडच नाही
आमची ग्रामपंचायत गेल्या पाच वर्षांपासून ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत स्मशानभूमी बांधण्याचे ठराव आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे पाठवत आहेत. मात्र त्याला मंजुरी न देता ठेकेदारांना काँक्रीट रोडला मंजुरी दिली जात आहे. स्मशानभूमी नसल्याने आदिवासींना मरणानंतर ही यातना भोगाव्या लागत आहेत.
तुकाराम पवार, उपसरपंच, पाथर्डी- बोटोशी, ग्रामपंचायत.





























































